नाथद्वारामध्ये एका सभेदरम्यान सीपी जोशी यांनी नरेंद्र मोदी आणि उमा भारती यांच्या जात आणि धर्मावर प्रश्न उपस्थित करुन निशाणा साधला होता. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जोशींचं विधान पक्षाला अडचणीत टाकू शकतं, हे लक्षात आल्यावर राहुल गांधींना डॅमेज कंट्रोलसाठी समोर यावं लागलं. सीपी जोशी यांचं विधान काँग्रेस पक्षाच्या आदर्श आणि तत्त्वांच्या विपरित असल्याचं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींची तंबी
सीपी जोशी यांच्या विधानानंतर राहुल गांधींनी त्यांना खेद व्यक्त करण्यास सांगितलं. गांधींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "सीपी जोशी यांचं वक्तव्य काँग्रेस पक्षाच्या मूल्यांच्या विरुद्ध आहे. पक्षाच्या नेत्यांनी असं कोणतंही विधान करु नये ज्यामुळे समाजातील एखाद्या घटकांच्या भावना दुखावतील. काँग्रेसच्या मूल्यांचा, कार्यकर्त्यांच्या भावनांना आदर करुन जोशी यांना चुकीची जाणीव नक्कीच होईल. त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त करायला हवा."
राहुल गांधींच्या निर्देशानंतर जोशींकडून खेद
राहुल गांधी यांनी तंबी दिल्यानंतर काही वेळातच सीपी जोशी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून आपल्या विधानावर खेद व्यक्त केला. त्यांनी लिहिलं आहे की, "काँग्रेसच्या मूल्यांचा आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत, माझ्या वक्तव्याने समाजाच्या कोणत्याही वर्गाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यासाठी मी खेद व्यक्त करतो."
सीपी जोशी काय म्हणाले होते?
सीपी जोशी गुरुवारी (23 नोव्हेंबर) एका सभेत बोलले होते ती, "उमा भारती यांची जात कोणाला माहित आहे का? ऋतंभरा जात कोणाला माहित आहे का? या देशात धर्माबाबत कोणाला माहित आहे तर ते पंडित. देश अजब बनला आहे. या देशात उमा भारती लोधी समाज आहेत आणि त्या हिंदू धर्माची गोष्ट करतात. साध्वीजी कोणत्या धर्माच्या आहेत? त्या हिंदू धर्माची गोष्ट करतात. नरेंद्र मोदी कोणत्या धर्माचे आहेत आणि ते हिंदू धर्माबाबत बोलतात. 50 वर्षात त्यांना अक्कल आली नाही.
भाजपचा हल्लाबोल
जोशी यांच्या वादग्रस्त विधानानंतर राजकारण तापलं असून भाजपने हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेत्याचं वक्तव्य धक्कादायक आहे. सीपी जोशी यांनी धर्माबाबत असं बोलायला नको होतं, असं ट्वीट भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केलं आहे. तसंच काँग्रेस फोडाफोडीच्या राजकारणाला प्रोत्साहन देत असल्याचंही भाजपने म्हटलं आहे.
तर वाद वाढल्यावर माझ्या वक्तव्याचा भाजपने विपर्यास केल्याचा आरोप सीपी जोशी यांनी ट्विटरवर केला आहे. भाजपने माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सादर केलं असून मी त्याचा निषेध करतो, असं ते म्हणाले.