नवी दिल्ली : शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्याचा निर्णय भाजपने एकट्याने कसा घेतला, त्यासाठी बैठक घेतली का? असा सवाल विचारल शिवेसना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर तोफ डागली आहे. इतर घटक पक्षांना विचारलं का? निर्णय कोणत्या आधारावर घेतला? शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्यासाठीचा हक्क भाजपला कुणी दिला. एखादी बैठक तरी बोलावली होती. शिवसेना एनडीएतून बाहेर पडली म्हणजे युपीए सोबत आलो, असं होत नाही. जनहित लक्षात घेऊन राष्ट्रीय पातळीवर भूमिका ठरवणार, असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं.


टीवटीव करणाऱ्यांचा एनडीएशी संबंध नाही 


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एनडीएचे संस्थापक होते. एनडीएच्या नावाने आज जे टीवटीव करत आहेत, त्यांचा एनडीएशी काहीही संबध नाही. एनडीए बनत असताना आताचे नेते गोधडीत रांगतही नव्हते. एनडीए कोणत्या एका पक्षाची नाही. त्यामुळे शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्याचा जो निर्णय झाला आहे, तो कोणत्या आधारावर झाला, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. जाणूनबुजून घडवलेलं हे क्रौर्य आहे, अशी टीका त्यांनी केली. शिवसेना एनडीएची संस्थापक आहे, मग शिवसेनेला बाहेर काढताना इतर घटक पक्षांना याबाबत विचारणा केली का? असं संजय राऊत यांनी विचारलं.



एनडीएमधून बाहेर पडलो म्हणजे यूपीएसोबत आहोत असं होत नाही


शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली म्हणजे आम्ही यूपीएसोबत आहोत, असं होत नाही. यूपीएमध्ये असणे किंवा नसणे हा वेगळा विषय आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी एक वेगळी आघाडी बनवत आहोत. महाराष्ट्राच्या जनतेने हा जनादेश दिला आहे. सद्यस्थितीला राज्यात दोन किंवा तीन पक्ष एकत्र आले नाहीत तर सरकार बनणार नाही. भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन करु शकत आहे. मात्र भाजप मोठा पक्ष असून सत्ता स्थापन करत नाही. तसेच आम्हाला दिलेला शब्द पाळत नाही.


भाजप विरोधी पक्षात बसायला तयार आहे. मात्र निवडणुकीपूर्वी युतीमध्ये जे ठरलं होतं, ते मान्य करुन सरकार स्थापन करायला तयार नाही. आम्ही तुम्हाला तुमच्या हक्काचं देणार नाही, ही भाजपची शिवसेनेबाबतची भूमिका आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. जनतेमध्ये शिवसेनेबाबत आस्था आहे, त्याला तडा देण्याचा हा प्रकार असल्याचंही त्यांनी म्हटलं.




संबंधित बातम्या