मुंबई : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एनडीए घटक पक्षाची एक बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला शिवसेना जाणार का ? असा प्रश्न निर्माण झालेला असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एनडीएच्या बैठकीला शिवसेना जाणार नसल्याचं सांगितलं आहे. एनडीए बैठकीचा निमंत्रण शिवसेनेला आलेलं नाही, शिवसेनेकडून या बैठकीला कोणीही जाणार नाही. त्यामुळे आता एनडीएमधून बाहेर पडण्याची फक्त आता औपचारिकता बाकी राहिली आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना केलं आहे.

राऊत म्हणाले की, एनडीए कुणाच्या मालकीची नाही. शिवसेना, अकालीदल हे एनडीएचे संस्थापक आहे. जे एनडीएचे सध्याचे सूत्रधार आहेत ते त्यावेळी नव्हते. आम्हाला एनडीएतून दूर होण्यासाठी राज्याची राजकीय परिस्थिती कारण आहे. स्वाभिमानासाठी आम्ही एनडीएतून बाहेर पडलो आहोत, असेही राऊत म्हणाले. जर आता बाहेर पडलो नसतो तर राज्यातील जनतेने आम्हला माफ केले नसते, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना राऊत म्हणाले, गोड आनंदाची बातमी लवकरच महाराष्ट्रला मिळणार त्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री लवकरच राज्याला मिळेणार आहे. शिवाय महाशिवआघाडीच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये कोणताच फॉर्म्युला मुख्यमंत्री पदासाठी ठरलेला नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

महापौर निवडणुकीत जिथे शिवसेनेचा महापौर आहे त्या महापालिकेत महापौर शिवसेनेच बसणार आहे. जिथे नाही अशा एक दोन ठिकाणी सुद्धा शिवसेनेचा महापौर बसवू. कुणाचा पाठिंबा घ्यायचा ते शिवसेना ठरवणार आहे. काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीचं सरकार 5 वर्ष टिकावं यासाठी सर्व भूमिका प्रत्येक पक्ष समजून घेत असल्याने त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी वेळ लागत आहे, असे राऊत म्हणाले.

आजच्या अग्रलेखबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, भाजपच्या कृतीमुळे घोडेबाजार केला जाईल अशी स्थिती निर्माण केली आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर अचानक आत्मविश्वास कसा निर्माण होतो. भाजपला राजभवनातून 30- 35 आमदार मिळाले का? असा सवाल देखील राऊत यांनी केला. त्यामुळे अशाप्रकारची कृती लोकशाहीसाठी घातक आहे, असेही ते म्हणाले.