भोपाळ : मध्य प्रदेशमधील पन्ना जिल्ह्यात पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गलेले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाच पुराने घेरलं. यावेळी त्यांना सुरक्षा रक्षकांनी उचलून पाण्याबाहेर नेलं. पाणी पार करण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी उचललं, असं स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिलं आहे.
पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी गेलो असता, एका पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी होतं. मात्र पुलाच्या पलिकडील लोक भेटण्यासाठी बोलावत होते, त्यामुळे सुरक्षा रक्षकांनीच उचलून नेलं, यामागे काही खास कारण नव्हतं, अशी माहिती चौहान यांनी दिली आहे.
मध्यप्रदेशमधील अनेक जिल्ह्यांना पुराचा जोरदार फटका बसला आहे. पूरग्रस्त गावांचा दौरा करण्यासाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांना दुथडी भरुन वाहणारी नदी पार करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली. पोलिसांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह यांना उचलून नदी ओलांडण्यास मदत केली. शिवराज सिंह यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल झाला आहे.