पणजी : कॉंग्रेसने कलम 370 मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. पराभवानंतर अध्यक्षपद सोडणाऱ्या राहुल गांधी यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही, परंतु कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी यासंबंधी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराज सिंह चौहान यांनी आज केली. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करत त्यांचा उल्लेख 'रणछोडदास' असा केला.
गोवा मुक्तीसाठी विलंब होण्याचे कारण हे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू असल्याचा आरोप चौहान यांनी भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला.
चौहान म्हणाले की, 'भारत स्वतंत्र झाल्यानंतरही गोवा पोर्तुगीजांच्या जोखडाखाली राहिला. गोमंतकीय स्वातंत्र्यासाठी लढा देत होते. गोवा मुक्त करणे त्यावेळी केंद्र सरकारची जबाबदारी होती. मात्र तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्यासाठी काहीच केले नाही'. जी नीती गोव्याच्या बाबतीत वापरली तीच नीती नेहरूंनी काश्मीरच्या बाबतीत वापरली असा आरोप चौहान यांनी केला.
राजा हरी सिंग यांनी काश्मीर भारतात सामाविष्ट करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतरही 370 कलमांतर्गत विशेष दर्जा देऊन काश्मीर कायमचे लटकत ठेवण्यात आले. तसेच पाकिस्तानी काश्मीरवर हल्ला केल्यानंतर आपल्या सैनिकांनी त्यांना जोरदार उत्तर दिल्यामुळे त्यांना पिछेहाट करावी लागली. पाकिस्तानने बळकावलेला काश्मीरचा भाग आपले लष्कर पुन्हा मिळवण्याच्या मार्गावर असताना संयुक्त राष्ट्र संघात जाऊन युद्धबंदी करण्याची घाई नेहरूंनी केली. ही नीती देश विघटीत करण्याची असल्याचे चौहान यांनी सांगितले.
जे कॉंग्रेसला 70 वर्षांत जमले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 48 तासात करून दाखवले आणि काश्मीरला लागू करण्यात आलेले 370 कलम रद्द करून टाकले. या ऐतिहासिक निर्णयाचे संपूर्ण देशवासियांनी स्वागत केले असले तरी या मुद्यावर नेमकी कोणती भूमिका घ्यावी याबाबत कॉंग्रेस गोंधळात आहे. कॉंग्रेसचे वेगवेगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वक्तव्ये या मुद्द्यावर करीत आहेत, असेही चौहान म्हणाले.
सोनिया गांधी यांनी 370 कलमावर भूमिका स्पष्ट करावी : शिवराजसिंह चौहान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Aug 2019 09:17 PM (IST)
जे कॉंग्रेसला 70 वर्षांत जमले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 48 तासात करून दाखवले आणि काश्मीरला लागू करण्यात आलेले 370 कलम रद्द करून टाकले. या ऐतिहासिक निर्णयाचे संपूर्ण देशवासियांनी स्वागत केले
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -