बेळगाव : बेळगावातील मणूर गावाला पुराने वेढलेले असताना देखील एका तरुणा आपला जीव धोक्यात घालून बॉक्सिंग स्पर्धेत सिल्व्हर मेडल मिळवण्याचा पराक्रम केला आहे. बेळगावातील पुरातून तब्बल दोन किलोमीटर अंतर पोहत जात बॉक्सर निशान कदमने पदक मिळवले.

सात ऑगस्ट रोजी बेळगाव आणि आजूबाजूच्या गावांना पुराचा वेढा पडला होता. गावांचा संपर्क तुटला होता. निसर्गापुढे सारेच हतबल झाले होते. घरातून बाहेर पडणे केवळ अशक्यच होते. अशा परिस्थितीत निशानलच्या जीवाची तगमग होत होती. संपूर्ण गावाला पुराचा वेढा पडला होता आणि त्याला राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेण्यासाठी बंगलोरला जायचे होते. काय करायचे हे त्याला आणि घरच्यांना देखील सुचत नव्हते. शेवटी वडिल मनोहर कदम यांनी त्याला सांगितले काहीही झाले तरी तुला बंगळुरुला जायची व्यवस्था मी करतो.

वडिलांनी मुलाचे बॉक्सिंगचे किट प्लास्टिकमध्ये गुंडाळून पाठीवर घेतले. मुलाला सांगितले की आपण आता पाण्यातून पोहत जायचे. घरापासून मुख्य रस्त्यापर्यंतचे  अंतर दोन किलोमीटर होते आणि पुराच्या पाण्याला प्रचंड ओढ होती. पाण्यात पाय ठेवला की आपोआपच पाण्याच्या जोराच्या प्रवाहाने पाय उचलले जायचे. शेवटी निशान आणि त्याचे वडील मनोहर यांनी धाडस करुन पाण्यात उडी घेतली आणि पोहत पोहत मार्ग काढत ते मुख्य रस्त्यापर्यंत आले.

घरापासून मुख्य रस्त्यापर्यंत जायला पाऊण तास लागला. तेथून प्रशिक्षकांनी निशानला आपल्यासोबत घेतले. तीन दिवसांत निरनिराळ्या मार्गाने प्रवास करत ते बंगळुरुला पोचले. पुराने गावाला वेढल्यामुळे काही दिवस प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव देखील निशानला करता आला नव्हता. त्याने घरीच आपल्याला जमेल तसा सराव केला.

बंगळुरुमध्ये राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत 49 किलो खालील वजन गटात निशानची लढत होती. अत्यंत दणकट शरीरयष्टीच्या प्रतिस्पर्ध्यासमोर निशान किरकोळ भासत होता. पण सामना सुरु झाल्यावर मात्र निशानने दाखवलेल्या चपळ हालचाली आणि लगावलेले जबरदस्त ठोसे यामुळे उपस्थितांनी निशानला प्रोस्ताहीत केले. एवढ्या प्ररीश्रमानंतर निशानने अंतिम फेरी गाठली पण त्याला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. अखेर त्याला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावे लागले.

प्रतिकूल परिस्थितीला टक्कर देऊन निशानने मिळवलेले सिल्व्हर मेडलचे मोल सुवर्ण पदकापेक्षा निश्चितच अधिक आहे. निशान बेळगावला परतल्यावर त्याचे धाडस आणि मिळवलेले यश याचे कौतुक होऊ लागले आहे. जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जावून त्याचा सत्कार करून रोख पारितोषिकही दिले. भविष्यात बॉक्सिंगसाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन गावातर्फे एस.एल.चौगुले यांनी दिले. निशानच्या सत्कारासाठी केवळ गावातीलच नव्हे तर शहर आणि परिसरातून लोक उपस्थित होते.

संपूर्ण गावाला पुराने वेढलेले असताना निशानने दाखवलेले धाडस कौतुकास्पद आहे. काहीही करुन मुलाला मुख्य रस्त्यावर नेऊन सोडायचे ही जिद्द बाळगून पुरातून पोहत जाण्याचे धाडस केले असे निशानचे वडील मनोहर कदम यांनी सांगितले. पुराच्या पाण्यातून मुलगा कसा पोहत जाणार याबद्दल मनात भीती निर्माण झाली होती. पण पोहत सुखरुप मुख्य रस्त्याला पोचला म्हटल्यावर मनावरचे दडपण कमी झाले. बंगळुरुमध्ये त्याने सिल्व्हर मेडल मिळवल्यावर त्याने घेतलेल्या कष्टाचे,जिद्दीचे सार्थक झाले असे वाटले.

अर्जुन पुरस्कार विजेते मुकुंद किल्लेकर आणि संघ व्यवस्थापक गजेंद्र त्रिपाठी यांचे मार्गदर्शन निशानला लाभले. निशान सध्या ज्योती कॉलेजमध्ये बारावीत शिकत असून मेरी कोम आणि विजयेंद्र सिंग हे त्याचे रोल मॉडेल आहेत. आता इशानला वेध लागले आहेत ते म्हैसूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेचं.