मुंबई : गोवा विधानसभेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेचा खासदार संजय राऊत यांनी मित्रपक्ष भाजपशिवाय शिवसेना गोव्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे.
गोव्यातून 20 ते 22 जागा लढवण्याचा शिवसेनेचा निर्धार असल्याचं राऊत म्हणाले. 'गोव्यात भाजपशी युती करण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही एकट्याने लढण्याची तयारी केली आहे.' असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.
कॅसिनो, बेरोजगारी, गोव्यात अवैधपणे राहणाऱ्या रशियन आणि नायजेरियन नागरिकांची वाढती संख्या, ड्रग माफिया, इंग्रजी माध्यमांच्या शाळांना दिल्या जाणाऱ्या अनुदानामुळे कोकणी आणि मराठी शाळांमधली विद्यार्थ्यांची गळती यासारख्या मुद्द्यांवर सेना निवडणूक लढणार आहे.
गेल्या 5 वर्षांत भाजपने अनेक आश्वासनं दिली, मात्र एकाचीही पूर्तता न केल्याचं राऊत म्हणाले. गोव्यातील रहिवाशांचे अनेक प्रश्न तातडीने सोडवण्याची गरज असल्याचंही राऊत यांनी सांगितलं आहे.
https://twitter.com/ANI_news/status/729259729277599744