नवी दिल्ली : 112 हा देशभरातील अत्यावश्यक सेवांसाठी असलेला एकमेव नंबर 1 जानेवारी 2017 पासून सुरु होणार आहे. पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल या सर्व सेवांसाठी देशभरात एकमेव टेलिफोन नंबर असेल.

 
यापुढे अत्यावश्यक सेवांसाठी विविध नंबर लक्षात ठेवण्याची गरज नाही, केवळ 112 हा नंबर डायल केल्यास, सर्व अत्यावश्यक सेवा उपलब्ध होतील. ट्राय अर्थात 'टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया'ने हा प्रस्ताव टेलिकॉम मंत्रालयापुढे ठेवला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती.

 
पोलिस (100), अग्निशमन दल (101), रुग्णवाहिका (102) आणि आपत्कालीन संकट (108) हे विविध अत्यावश्यक सेवांसाठी लागणारे नंबर येत्या वर्षअखेरपर्यंत सुरु राहणार आहेत. मात्र 112 या क्रमांकाबाबत लोकांपर्यंत माहिती पोहचल्यानंतर जुने क्रमांक बंद होतील. अमेरिकेत ज्याप्रमाणे 911 हा एकमेव नंबर आहे, त्याप्रमाणे भारतात हा नंबर असेल.

 
तुमचं सिमकार्ड किंवा लँडलाईन नंबर काही काळासाठी बंद असेल किंवा आऊटगोईंग बंद असेल, तरीही हे 112 या क्रमांकावर तुम्ही कॉल करु शकाल. त्याचप्रमाणे एसएमएसद्वारेही ही सुविधा उपलब्ध असेल. लोकेशन ट्रेस करुन तुमच्या गरजेनुसार संबंधित विभागाकडून मदत केली जाईल.

 
त्याचप्रमाणे पॅनिक बटणवर 112 नंबर सेव्ह करता येईल. नियमानुसार 1 जानेवारी 2017 नंतर प्रत्येक मोबाईलमध्ये पॅनिक बटण अत्यावश्यक राहिल, शिवाय इन बिल्ट जीपीएसही प्रत्येक मोबाईलला गरजेची राहील.