मुंबई : अवघ्या दोन दिवसात शिवसेनेचा चढलेला आवाज नरम झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवारांसोबत जातात, तर आपण ममता बॅनर्जींसोबत का जाऊ नये? असा सवाल करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज थेट मोदींच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

“नोटाबंदीचा निर्णय उत्तम आहे आणि आम्ही एनडीए म्हणून सरकारसोबतच आहोत. फक्त लोकांना त्रास होऊ नये”, अशी अपेक्षा उद्धव यांनी व्यक्त केली आहे.

राजनाथ-उद्धव ठाकरे चर्चा

 

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि उद्धव ठाकरे यांच्यात आज सकाळी फोनवरुन दीर्घ चर्चा झाली. त्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीदिनासाठी शिवाजी पार्कावर आलेले उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते.

...म्हणून राजनाथ यांचा उद्धव ठाकरेंना फोन!

मित्रपक्ष असेलल्या शिवसेनेने नोटाबंदीचा निर्णयाला विरोध करत ममतांना साथ दिल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे. मित्रपक्ष विरोधकांना सामील होऊ नये यामुळे भाजपच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेची भूमिका समजून घेण्यासाठी राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा केली.

नोटाबंदीच्या निर्णयाचं स्वागत, मात्र...

 

राजनाथ यांच्यासोबत चर्चेत उद्धव ठाकरे यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं. मात्र त्याच्या अंमलबजावणीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

तृणमूल-आपच्या मोर्चात शिवसेना खासदारही सहभागी

 

मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर शिवसेनेने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला. ममतांनी बुधवारी राष्ट्रपती भवनापर्यंत आयोजित केलेल्या मोर्चात शिवसेनेचे खासदारही सहभागी झाले होते.