नवी दिल्ली :  माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गिते यांच्यावर पवारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पक्षातून काही कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण गितेंच्या वक्तव्यावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट निशाणा साधला आहे. अशा प्रकारची वक्तव्यं कुणी करत असेल तर आम्ही दखल घेत नाही. उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार यांनीच सुचवलं होतं. शरद पवार हे आम्हा सगळ्यांचे नेते आहेत. बाळासाहेब आणि पवार सुद्धा एकत्रित व्यासपीठावर यायचे हे सांगतानाच संजय राऊत यांनी गितेंचं विधान पक्षशिस्तीत बसणारं नाही असंही म्हटलं आहे. 


सेना-राष्ट्रवादीत 'खंजीर' वॉर? शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत; शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीतेंचं वक्तव्य


अशा प्रकारची वक्तव्यं पक्षशिस्तीत बसत नाहीत. ही पक्षाची अधिकृत भूमिका अजिबात नाही. त्यांच्या भावना असतील, पण महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्याविषयी असं बोलणं चुकीचं. कारवाई काय करायची ते उद्धव ठाकरे ठरवतील. असं म्हणत संजय राऊत यांनी गितेंच्या विधानावर थेट निशाणा साधला आहे. त्यामुळे आता या विधानावरुन गितेंना कुठल्या पक्षांतर्गत कारवाईला सामोरं जावं लागू शकतं का हा प्रश्न उपस्थित होत आहे.



चंद्रकांत पाटलांची किंमत सव्वा रुपयाच- संजय राऊतांचा निशाणा


पीएमसी बॅंक घोटाळ्यातले पैसे राऊत कुटुंबाला प्राप्त झाले असा आरोप करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना थेट कोर्टात खेचण्याची तयारी संजय राऊत यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांचं याबाबतचं पत्र आज सामना वृत्तपत्रात छापून आलं आहे. पण पुढच्या चार दिवसात चंद्रकांत पाटील यांना माझी कायदेशीर नोटीस जाईल. मी नोकरदार माणूस आहे, मध्यमर्गीय. घोटाळे करत बसलो असतो तर राजकारणात टिकलो नसतो असं म्हणत संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांचे आरोप फेटाळले आहेत. शिवाय लोक शंभर कोटींचा दावा करतात, पन्नास कोटींचा करतात. पण यांची एवढी लायकी नाही. मी यांच्यावर सव्वा रुपये अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांना कोर्टात खेचण्याचा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. 


संजय राऊत म्हणाले की,  मुंबईतल्या आमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये दोन ग्रॅम हेरॉईन सापडलं तेव्हा अख्ख्या देशात गोंधळ घातला.  रिया चक्रवर्तीला भंडावून सोडलं. जगातली सगळ्यात मोठी अमली पदार्थाची खेप पकडली गेली. एवढी मोठी अमली पदार्थाची खेप नेमकी कोणासाठी चालली होती कोणाला पैसे मिळाले कोण मध्यस्थी करत होतं असा सवालही राऊतांनी केला.