लखनौ : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या आघाडीमुळे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव फारच आनंदी दिसत आहेत. यावरुन त्यांनी भाजपवर निशाणा साधत ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे.


अखिलेश यादव यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, "पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाला पराभूत करणारी जागरुक जनता, लढाऊ ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या समर्पित नेते आणि कार्यकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन. भाजपने एका महिलेवर केलेल्या 'दीदी ओ दीदी' या अपमानजनक टिप्पणीला जनतेने दिलेलं हे सडेतोड उत्तर आहे."






पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. या कलांनुसार तृणमूल काँग्रेसने 200 जागांचा टप्पा पार केला आहे. तृणमूल काँग्रेस 208 जागांवर पुढे असून भाजपची आघाडी 80 जागांवर आली आहे. सर्वात दयनीय अवस्था डावे आणि काँग्रेस आघाडीची आहे. कलानुसार त्यांना केवळ एकाच जागेवर आघाडी मिळवता आली. तर अन्य उमेदवारांना दोन जागा मिळाल्या आहेत.


दरम्यान, एकीकडे तृणमूल काँग्रेसने दमदार फरफॉर्मन्स केला असताना, नंदीग्राम मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मात्र साजेशी कामगिरी करता आली नाही. सुरुवातीपासूनच त्या पिछाडीवर होत्या. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे शुभेंदू अधिकारी आघाडीवर होते.