‘सामना’तून भाजपच्या उपोषणावर टीका
“हिंदुस्थानच्या राजकारणात सध्या एकमेकांची टोलवाटोलवीच सुरू आहे. काँग्रेसचे उपोषणास्त्र फसल्यावर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘भाजप’ने एक दिवसाचा उपवास करायचे ठरवले आहे. मोर आणि लांडोरांची ही अशी स्पर्धा सुरू आहे, पण देशातील मोठ्या वर्गाचे हाल व उपासमार थांबत नसल्याने आत्महत्यांचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे या उपवासनाट्याने काय साध्य होणार?”, अशा शब्दात ‘सामना’तून निशाणा साधण्यात आला आहे. ट
मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत गिते यांना स्वपक्षाचीच ‘सामना’तील भूमिका मान्य नसावी. म्हणून की काय, ते दिल्लीत भाजपच्या मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून उपोषणाला बसले होते.
अनंत गिते काय म्हणाले?
लोकसभेचं अधिवेशन विरोधकांनी ठप्प केले. त्यांच्या निषेधार्थ हे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आहे. स्वत: पंतप्रधान उपोषण करणार आहेत, असे सांगत अनंत गिते पुढे म्हणाले, “सरकारचा एक भाग म्हणून उपोषणाला बसलो आहे. मी सरकारचा अंग आहे. मंत्री म्हणून इथे आलो आहे.”
‘सामना’चा अग्रलेख ‘सामना’चा आहे. त्यांना आपलं मत मांडण्याच पूर्ण अधिकार आहे. आपल्याला भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असे म्हणत अनंत गितेंनी मात्र स्वपक्षाची भूमिकाच मान्य नसल्याचे अधोरेखित केले.
‘माझा’च्या बातमीनंतर गितेंचा मंचावरुन काढता पाय
अनंत गिते यांनी भाजपच्या मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून उपोषणात हजेरी लावल्याची बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर, तातडीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत आदेश धाडले आणि अनंत गितेंना उपोषणातून तातडीने उठण्याचे आदेश दिले.
उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर अनंत गितेंनी उपोषणाच्या मंचावरुन काढता पाय घेतला.
शिवसेनेच्या अनेक मंत्री आणि नेत्यांनी अनंत गितेंच्या उपोषणातील सहभागाबद्दल नाराजी व्यक्त केली.