राहुल गांधी काय म्हणाले आणि कशासंदर्भात?
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची पत्नी सीमा गोयल यांची ‘इंटरकॉन अॅडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची 10 वर्षांपूर्वी केवळ एक लाख रुपये गुंतवणूक होती. मात्र आता हीच कंपनी 30 कोटी रुपये निव्वळ नफा कमावते आहे. कंपनीच्या एकण 10 हजार शेअर्समधील प्रत्येक शेअरची किंमत 30 हजार रुपये कशी?, असा सवाल काँग्रेसने केला होता. या संदर्भात ‘नवजीवन’ या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर यासंदर्भात बातमी प्रसारित झाली. त्या बातमीची लिंक आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर करत, राहुल गांधींनी कॅप्शन दिले की, "शिरडी के चमत्कारों" की तो कोई "सीमा" ही नहीं है|
सीमा गोयल यांच्यावर निशाणा साधण्यासाठी राहुल गांधी यांनी पियुष गोयल यांच्यावर टीका केली. मात्र यावेळी त्यांनी "शिरडी के चमत्कारों" असा शब्द वापरला आणि राहुल फसले. कारण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही साईभक्तांची मोठी संख्या आहे. त्यामुळे त्यांची नाराजी राहुल गांधी यांन ओढवून घेतली आहे.
पियुष गोयल आणि ‘शिर्डी इंडस्ट्रीज’चे संबंध काय?
काही दिवसांपर्वी काँग्रेस नेत्यांनी आरोप केला होता की, “केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे 25 एप्रिल 2008 ते 1 जुलै 2010 या काळात शिर्डी इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि पूर्णवेळ संचालक होते. या काळात यूनियन बँकेच्या अध्यक्षतेतील बँकेकडून 258 कोटी 62 लाखांचे त्यांनी कर्ज घेतले होते. मात्र त्यांनतर गोयल यांनी कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर या कंपनीच्या कर्जातील 65 टक्के कर्ज माफ करण्यात आले.”
त्यामुळे, राहुल गांधी यांना आपल्या ट्वीटमध्ये ‘शिर्डी इंडस्ट्रीज’बाबत बोलायचे होते, मात्र साईभक्तांनी साईबाबांशी संबंध जोडून त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते आहे.
राहुलजी, माफी मागा : डॉ. सुरेश हावरे
त्यात आता श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनीसुद्धा या वादात उडी घेतली आहे. ते म्हणाले, “राहुलजी, राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये ‘शिर्डी’ला आणणं दुर्दैवी आहे. यामुळे देश-विदेशातील साईभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. सर्व साईभक्तांकडून आम्ही तुमच्या वक्तव्याचा निषेध करतो. तुम्ही या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी.”
आता राहुल गांधी हे साईभक्तांसाठी आपल्या वक्तव्याप्रकरणी पुन्हा स्पष्टीकरण देतात का आणि विरोधक या वक्तव्यावरुन किती आक्रमक होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.