नवी दिल्ली : विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर शिवसेना मोदी सरकारच्या बाजूने मतदान करणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी सर्व खासदारांनी लोकसभेत उपस्थित राहावं यासाठी शिवसेनेकडून व्हीप जारी करण्यात आला आहे.


आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी मान्य न केल्यामुळे टीडीपीने एनडीएशी फारकत घेतली. आता पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. त्याच्यावर उद्या लोकसभेत मतदान होणार आहे. याआधी अविश्वास ठरावादरम्यान शिवसेना बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा रंगली होती.

मात्र शिवसेनेचे लोकसभेतील प्रतोद चंद्रकांत खैरे यांच्या स्वाक्षरीने तीन ओळींचा व्हिप जारी करण्यात आला आहे. "अनिवार्य रुप से उपस्थित रहकर सरकार के पक्ष का समर्थन करें", अशी या व्हिपमधली शेवटची ओळ आहे. या संदर्भात उद्या सकाळी दहा वाजता शिवसेनेची बैठक होणार आहे.

शिवसेना सभागृहाबाहेर कायम मोदी सरकारवर टीका करत असते. सामनातूनही मोदींविरोधात भूमिका घेतल्या जातात. लोकसभेत मात्र शिवसेना मोदींच्या मदतीला धावून जाताना दिसत आहे. दरम्यान लोकसभेत शिवसेनेचे सध्या 18 खासदार आहेत.

लोकसभेतील आकडेवारीचं गणित
लोकसभेत 545 सदस्यसंख्या आहे. त्यापैकी 2 राष्ट्रपती नियुक्त आहेत. म्हणजेच एकूण 543 खासदार निवडून आलेले आहेत. सध्या 9 जागा रिक्त आहेत. म्हणजे सध्या 534 खासदार लोकसभेत आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा 268 झाला आहे.

लोकसभेत सर्वाधिक खासदार असलेल्या एकट्या भाजपकडे तब्बल 272 खासदारांचं बळ आहे. म्हणजेच भाजप एकट्याच्या बळावर अविश्वास प्रस्ताव फेटाळू शकेल. त्यामुळे सरकारला धोका नाही.

दुसरीकडे भाजपच्या मित्रपक्षांचे मिळून 40 खासदार आहेत. त्यामुळे एनडीएकडे भाजप 272 + मित्रपक्ष 40 म्हणजेच एकूण 312 खासदारांचं समर्थन आहे.

यामध्ये शिवसेना 18, एलजेपी 6, अकाली दल 4, आरएलएसपी 3, अपना दल 2, जेडीयू 2 आणि एन आर काँग्रेस, पीएमके, एनपीपी, एनडीपीपी, एसडीपी यांच्या प्रत्येक एक खासदाराचा समावेश आहे.