चंदिगढ : पत्नीच्या वर्णावरुन तिला हिणवणं तुम्हाला महागात पडू शकतं. पतीने 'काळी कुळकुळीत' (काली कलौती) म्हटल्यामुळे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने महिलेला घटस्फोट देण्यास परवानगी दिली.


महेंद्रगडमध्ये राहणाऱ्या संबंधित महिलेचा पतीसोबत स्वयंपाकावरुन वाद झाला होता. त्यानंतर पतीने तिला इतरांसमोर रंगावरुन टोमणा मारला. अपमानास्पद वागणुकीमुळे तिने कोर्टात घटस्फोटाची मागणी केली होती.

न्या. एमएमएस बेदी आणि न्या. गुरविंदर सिंह गिल यांच्या खंडपीठाने महिलेला घटस्फोटासाठी परवानगी दिली.

महिलेला तिच्या वर्णावरुन चिडवणं, ही क्रूर वागणूक असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. पत्नीला लज्जास्पद वागणूक देऊन तिला सासर सोडण्यास भाग पाडण्यात आलं, असं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं

आपल्याला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात आला, हे महिला पुराव्यानिशी सिद्ध करण्यास महिला यशस्वी ठरली.

स्वयंपाक व्यवस्थित न केल्यास महिलेला 'काळी' असा टोमणा मारला जात होता. नोव्हेंबर 2012 मध्ये तिने नवऱ्याचं घर सोडलं आणि माहेरी निघून आली. तिच्या आई-वडिलांनी सासरच्यांशी संपर्क साधून प्रकरण सोडवण्याची विनंती केली. मात्र त्यांना नकार देत मुलाचं दुसरं लग्न लावून देण्याची धमकी दिली, असं वकिलांनी न्यायालयात सांगितलं.