लेफ्टनंट कर्नलच्या मुलीवर बलात्कार, कर्नल अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 23 Nov 2017 12:25 PM (IST)
मुलीच्या वैद्यकीय चाचणीनंतर कर्नलला अटक करण्यात आली. या प्रकरणात आणखी एका आरोपीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रातिनिधीक फोटो
शिमला : लेफ्टनंट कर्नलच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपात शिमला पोलिसांनी सैन्यातील एका आर्मी कर्नलला अटक केली आहे. मुलीला मॉडेलिंगचं आश्वासन देऊन आपल्या घरी बोलावलं आणि तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप कर्नलवर आहे. बलात्काराचा आरोपी कर्नल सैन्याच्या ट्रेनिंग कमांडमध्ये तैनात आहे. देशातील सात कमांडमध्ये या कमांडचा समावेश होतो. इथे सुरक्षा दलातील जवानाना प्रशिक्षण दिलं जातं. मुलीच्या वैद्यकीय चाचणीनंतर कर्नलला अटक करण्यात आली. या प्रकरणात आणखी एका आरोपीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या तक्रारीनुसार, आरोपीने मला आणि वडिलांना शिमलातील एका थिएटरमध्ये बोलावलं होतं. त्यानंतर तो आम्हाला जेवणासाठी घेऊन गेला. मुलीला मॉडेलिंगसाठी मुंबईला पाठवा, असं आरोपीने वडिलांना सांगितलं. आरोपीच्या गोड बोलण्यामुळे मुलीनेही कर्नलला स्वत:चे फोटो पाठवले आणि त्याला भेटण्यासाठी ती मुंबईतील घरी पोहोचली. बॉलिवूडमध्ये नामवंत कलाकारांशी भेट करुन देईन, त्यामुळे मुलीला घरातच राहू देण्याची गळ आरोपीने घातली. यानंतर तरुणी कर्नलच्या घरीच थांबली. इथे आरोपीने मुलीला दारु पाजली. तिला जबरदस्तीने खोलीत घेऊन गेला आणि बलात्कार केला. जर याची वाच्यता केली तर वडिलांची नोकरी जाईल, अशी धमकीही दिल्याचं तरुणीने सांगितलं. शिमलाला परतल्यानंतर मुलीने संपूर्ण घटनेची माहिती वडिलांना दिली. मुलीच्या तक्रारीनंतर शिमला पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर वैद्यकीय चाचणीनंतर आरोपी कर्नलला अटक करण्यात आली.