नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन लांबल्याने विरोधकांची मोदी सरकारवर टीका सुरु आहे. मात्र 15 डिसेंबर ते 5 जानेवारी या काळात हिवाळी अधिवेशन घेतलं जाऊ शकतं, अशी माहिती आहे. सरकारने हा निर्णय घेतल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.


हिवाळी अधिवेशन लांबणीवर टाकल्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरु केली होती. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रविवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मोदी सरकारवर टीका केली होती. हे सरकार संसदेला तोंड द्यायला घाबरत असल्याने हिवाळी अधिवेशन लांबणीवर टाकत आहे, असा आरोप त्यांनी केला होता.

मात्र केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी हे सगळे आरोप फेटाळले. येत्या अधिवेशनात सरकार चांगल्या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.