मुंबई : इस्लाम प्रसारक झाकीर नाईकने आपण शांतीदूत असल्याचं सांगत, सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र त्याचवेळी पीस टीव्हीवरील बंदी चुकीचं असल्याचं नाईक म्हणाला. भारतात माझ्यावर मीडिया ट्रायल सुरु असून, येत्या 2 दिवसात 10 चॅनेल्सना कायदेशीर नोटीस पाठवणार आहे, असा इशारा नाईकने दिला.

 

झाकीर नाईकने आज स्काईपद्वारे सौदी अरेबियातून प्रेस कॉन्फरन्स घेतली. मुंबईतील माझगाव परिसरातील त्याच्या एका हॉलमध्ये, स्काईपद्वारे त्याने बातचीत केली.

 

माध्यमांवर आगपाखड

यावेळी नाईकला पत्रकारांनी विविध प्रश्न विचारले. इस्लाम प्रचारक असलेल्या झाकीर नाईक यांना मुस्लिमांचं शिक्षण, सामाजिक स्थितीची जाणीव आहे का? किती मुस्लिम मुलांनी अर्धवट सोडल्याची माहिती आहे का? याबाबतचे प्रश्न विचारल्यानंतर, नाईकने हा प्रश्न आजच्या विषयाशी संबंधित नसल्याचं सांगितलं. तसंच याबाबतची माहिती नसल्याचंही मान्य केलं.

 

अर्नब गोस्वामींबाबत आक्षेपार्ह भाषा

भारतीय मीडिया माझ्याबाबत प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप, झाकीर नाईकने केला. तसंच टाईम्स नाऊ वाहिनीचे संपादक अर्नब गोस्वामी यांच्याबाबत तर झाकीर नाईकने सातत्याने आक्षेपार्ह भाषा वापरली.

 

'शेर का बच्चा है, तो स्टुडिओ के बाहर आ', असं म्हणत झाकीर नाईकने अर्नब नाईक यांचा उंदीर असा उल्लेख केला.  तसंच नाईकने गोस्वामी यांना वादविवादसाठी जाहीर आव्हान दिलं.


 

पीस टीव्हीवरील बंदी चुकीची

यावेळी झाकीर नाईकने पीस टीव्हीवरील बंदी चुकीची असल्याचा दावा केला. टीव्ही प्रसारणासाठी आम्ही माहिती-प्रसारण मंत्रालयाला 2008 सालीच अर्ज केला होता. मात्र प्रसारणाला (Downlinking) परवानगीच नसल्याने तुम्ही बंदी कशी घालू शकता. केवळ हे मुस्लिम चॅनेल असल्यानेच त्यावर बंदी घातली, असा आरोप नाईकने केला.

 

भारतात कधी परतणार?

झाकीर नाईकला भारतात कधी परतणार, याबाबत सातत्याने विचारण्यात आलं. त्यावेळी त्याने कदाचित पुढच्या वर्षी येईन असं उत्तर दिलं.

 

बांगलादेशातील हल्लेखोर झाकीर नाईकच्या भाषणाने प्रभावित

काही दिवसांपूर्वी बांगलादेशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी हा झाकीर नाईकच्या भाषणांनी प्रभावित होता. त्यामुळे बांगलादेशात झाकीर नाईकच्या पीस टीव्हीवर बंदी घालण्यात आली. याशिवाय भारतातही हा चॅनेल बंद करण्यात आला आहे.

 

तरुणांची माथी भडकावून, अशांतता निर्माण करत असल्याचा आऱोप झाकीरवर आहे.