कोलकाता: इसिस किंवा इतर दहशतवादी संघटनांकडे वळणाऱ्या तरुणांना वाचवण्यासाठी कोलकातातील इमाम सोशल मीडियाचा आधार घेण्याच्या विचारात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व इमाम एकत्रित येऊन तरुणांना इस्लामचा खरा अर्थ समजावून सांगून शांततेचा संदेश प्रसारित करणार आहेत. पश्चिम बंगालचे ज्येष्ठ इमाम कारी फजलुर रहमान यांनी ही माहिती दिली.

 

 

इसिस तरुणांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचाच आधार घेत असल्याचे समोर आल्यानंतर इमामांनी देखील या विरोधात आघाडी उघडण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेणार असल्याचा निर्णय घेतला. इसिस आणि इतर कट्टरवादी संघटना इस्लाम आणि कुराणाचा चुकीचा अर्थ सांगून तरुणांची माथी भडकवत आहेत. त्यामुळे या विषयावरून मी इतर इमाम आणि इस्लामच्या अभ्यासकांशी चर्चा करीत असून यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय न झाल्याचे रहमान यांनी सांगितले.

 

मुस्लीम धर्मात हिंसेला थारा नाही.

 

मुस्लीम धर्म हत्या किंवा हिंसाचाराचा आधार घेण्याची शिकवण देत नाही. मुस्लीम धर्म शांती आणि बंधूभावाची शिकवण देतो. आमचा मुख्य उद्देश मुस्लीम धर्माचा योग्य अर्थ सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध भाषांमध्ये प्रसारित करणे आहे. त्यामुळे मुस्लीम धर्माचा खरा अर्थ समाजातील सर्व वर्गापर्यंत पोहोचू शकेल. असेही रहमान यांनी सांगितले. याबाबतचा निर्णय झाल्यानंतर हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत अरबी, उर्दू, बंगाली, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये इस्लाम धर्मासंदर्भातील साहित्य सोशल मीडियातून प्रसारित करण्यास सुरुवात होणार आहे.