खा. गायकवाडांवर विमान प्रवास बंदी, शत्रुघ्न सिन्हांनी एअर इंडियाला सुनावलं!
एबीपी माझा वेब टीम | 30 Mar 2017 02:32 PM (IST)
नवी दिल्ली: शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर एअर इंडियानं गायकवाड यांच्या विमान प्रवासावर बंदी आणली आहे. एअर इंडियाच्या या कारवाईवर भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी या कारवाईला विरोध केला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरवर याविषयी आपली नाराजी व्यक्त केली. 'खासदाराचं वागणं चुकीचं होतं. पण त्यांच्या विमान प्रवासावर अशा पद्धतीनं बंदी घालणं हे देखील चुकीच आहे. ही काही तुमची खासगी मालमत्ता नाही.' अशा शब्दात सिन्हा यांनी सुनावलं. शिवसेनेनं या प्रकरणी संसदेत विमान कंपन्यांविरोधात हक्कभंगही दाखल केला आहे. पण हक्कभंग दाखल केल्यानंतरही एअर इंडियाच्या भूमिकेत कोणतीही नरमाई आलेली नाही. एअर इंडियासह सात एअरलाईन्स कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावर बंदी घातली आहे. काय आहे प्रकरण? उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड हे पुण्याहून दिल्लीला जात होते. बिझनेस क्लासचं तिकीट असताना आपल्याला इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं, असा दावा गायकवाड यांनी केला. रवींद्र गायकवाड त्याची तक्रार दिल्लीत गेल्यावर करणार होते. दिल्लीत विमान पोहोचल्यानंतर त्यांनी तक्रार पुस्तिका मागवली, पण एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी नकार दिला, असा दावा गायकवाड यांनी केला. विमानातून सर्व कर्मचारी उतरुन गेल्यानंतरही रवींद्र गायकवाड बसून राहिले. तक्रार करण्याचा त्यांचा हट्ट होता. त्यानतंर क्रू मेंबरने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला बोलावलं. मात्र त्या कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा केली, असं रवींद्र गायकवाड यांचं म्हणणं आहे. ‘मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही, मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो, अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले’’, अशी कबुली रवींद्र गायकवाड यांनी दिली.