पाटणा : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी आज पक्षाला रामराम ठोकला. त्यांच्या या निर्णयानंतर यशवंत सिन्हांचे कट्टर समर्थक शत्रुघ्न सिन्हादेखील पक्षाला लवकरच सोडचिठ्ठी देतील, अशा बातम्या येत होत्या. पण आपण कुठेही जाणार नसल्याचं शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्ट केलं आहे.


बिहारची राजधानी पाटणामधील श्रीकृष्ण मेमोरियल हॉलमध्ये भाजप विरोधी पक्षांच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. “मला 2019 च्या लोकसभा निवडणूकीत उमेदवारी मिळणार नसल्याने, मी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची अफवाह आहे. पण मला आज हे स्पष्ट करायचं आहे की, मी कुठेही जात नाही.” असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.


दुसरीकडे त्यांनी यशवंत सिन्हांच्या निर्णयाचेही कौतुक केलं. “यशवंत सिन्ह यांचं देशाच्या राजकारणात मोठं योगदान आहे. त्यांनी राजकारणात अनेक त्याग केले आहेत. त्यांच्या निर्णय कौतुकास्पदच आहे,” असं ते यावेळी म्हणाले.

विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी लालू प्रसाद यादव यांचे सुपूत्र तेजस्वी यादव यांची मुक्तकंठाने स्तुती केली. “बिहारच्या राजकारणात तेजस्वी यादव यांचं आगामी काळात महत्त्वाचं स्थान असेल,” असे शत्रुघ्न सिन्हा यावेळी म्हणाले.

माजी केंद्रीय अर्थ मंत्री यशवंत सिन्हा यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला. विरोधी पक्षातील नेत्यांसोबत आज झालेल्या बैठकीनंतर सिन्हा यांनी हा निर्णय जाहीर केला.

त्यामुळे आधीच मित्रपक्षांच्या नाराजीचा सामना करत असलेल्या भाजपला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

संबंधित बातम्या

अखेर यशवंत सिन्हा यांचा भाजपला रामराम!

मोदींच्या नाकी दम आणण्यासाठी यशवंत सिन्हांच्या नव्या हालचाली

देशात आणीबाणी सदृष्य परिस्थिती : यशवंत सिन्हा