नवी दिल्ली : 12 वर्षांपर्यंतच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्या दोषींना फाशी देण्याच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या अडीच तासांच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.


आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हा कायदा अंमलात येणार आहे. यानंतर घडणाऱ्या अल्पवयीन मुलींवर बलात्कारांच्या प्रकरणात कायद्यातील नव्या तरतुदी लागू होतील.

काश्मीरमधील कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर केंद्र मंत्रिमंडळाने 'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्स' अर्थात पोक्सो कायद्यात सुधारणा करण्यास परवानगी दिली आहे. अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

सध्या पोक्सो कायद्यात जास्तीत जास्त जन्मठेप आणि कमीत कमी सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

शिक्षा किती?

- नवजात बालिकांपासून 12 वर्षांखालील वयाच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना कमीत कमी 20 वर्षांची किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते. 


- नवजात बालिकेपासून 12 वर्षांखालील वयाच्या मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्यास जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते.


- 12 वर्षांपासून 16 वर्षांपर्यंतच्या मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्यास दोषींना जन्मठेप होऊ शकते.


- 16 वर्षांखालील कमी वयाच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्या दोषीला कमीत कमी 20 वर्ष तुरुंगवास होऊ शकतो. जी जन्मठेपेपर्यंत वाढवली जाऊ शकते. सध्या ही शिक्षा कमीत कमी दहा वर्षांची आहे.


- 16 वर्षांवरील जास्त वयाच्या मुलीवर/महिलेवर बलात्कार झाल्यास दोषीला कमीत कमी दहा वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, जी जन्मठेपेपर्यंत वाढवली जाऊ शकते. सध्या ही शिक्षा कमीत कमी सात वर्षांची आहे.


तपास प्रक्रिया आणि कायदेशीर कारवाई


- बलात्काराच्या सगळ्या प्रकरणांचा तपास दोन महिन्यात पूर्ण करणं आवश्यक आहे.

- खटल्यावरील युक्तीवाद तसंच सुनावणीसाठीही दोन महिन्यांचा काळ निश्चित करण्यात आला आहे.

- तसंच आव्हान देणाऱ्या याचिका सहा महिन्यांच्या आत निकाली लावणं गरजेचं आहे.

जामीन

- 16 वर्षांखालील मुलींवर बलात्कार तसंच सामूहिक बलात्कार प्रकरणात अंतरिम जामीन मिळणार नाही

- 16 वर्षांखालच्या मुलींवरील बलात्काराच्या प्रकरणात जामीन अर्जावरील सुनावणीआधी पीडित मुलीचे नातेवाईक आणि सरकारी वकिलांना 15 दिवसांची नोटीस मिळणार

व्यवस्थेत सुधारणा

- नव्या फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना

- सरकारी वकिलांसाठी पदं घोषित होणार

- सर्व पोलिस स्टेशन आणि रुग्णालयात बलात्कार पीडितेसाठी फोरेन्सिक किट उपलब्ध केलं जाणार

- बलात्काराशी संबंधित प्रकरणांचा निकाल निश्चित वेळेत लावण्यासाठी विशेषत: अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार

- प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बलात्कारांशी संबंधित प्रकरणांसाठी विशेष फॉरेन्सिक लॅब बनवली जाणार

कठुआ बलात्कार : फाशीसाठी पॉक्सोमध्ये बदल करणार : मेनका गांधी

"अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी मी आणि माझं मंत्रालय पॉक्सो कायद्यात बदल करणार आहे," असं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री काही दिवसांपूर्वीच म्हणाल्या होत्या.

चिमुकलीवर अमानुष अत्याचार

जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये 8 वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आठव्या आरोपीविरोधात सोमवारी आरोपपत्र दाखल करण्यात आलं. दरम्यान, या घटनेनंतर आता सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

10 जानेवारीला मुलगी खेचर चारण्यासाठी कठुआजवळच्या जंगलात गेली होती. तिथून तिचं एका अल्पवयीन आरोपीने अपहरण केलं आणि जवळच्या मंदिराच्या तळघरात लपवलं. सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष अत्याचार केले. या नराधमांनी अनन्वित अत्याचारानंतर तिची हत्या केली.

शोधाशोध करुन थकल्यावर 12 जानेवारीला तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली.

17 जानेवारीला जंगलात तिचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एसआयटीकडे सोपवण्यात आला. मुख्य आरोपी आणि माजी सरकारी अधिकारी संजी राम हा दोन महिने फरार होता. मार्चमध्ये संजी राम स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. मेरठमधून त्याचा मुलगा विशालला अटक करण्यात आली.

संजी रामला मदत करणं आणि चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. दोन महिन्यांनी आरोपपत्र दाखल करण्यास वकिलांनी विरोध केल्याने देशभरातून संतापाची लाट उसळली आहे.

वकिलांचा आरोपींना पाठिंबा
धक्कादायक म्हणजे, जम्मू बार असोसिएशनने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कारवाईविरोधातच निदर्शनं केली. या बार असोसिएशनने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी केली.

चित्रपट, क्रीडासह अनेक क्षेत्रातील दिग्गज आक्रमक
प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, संजय दत्त, सोनम कपूर, रेणुका शहाणे, फरहान अख्तर, जावेद अख्तर, रितेश देशमुख, टेनिस स्टार सानिया मिर्झा, माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर यांसह अनेक दिग्गजांनी ट्विटरवरुन तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काँग्रेसचा कँडल मार्च
उन्नाव आणि कठुआ बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मध्यरात्री 12 वाजता दिल्लीतील इंडिया गेटवर मोर्चा काढला. बेटी पढाओ बेटी बचाओचा नारा देणाऱ्या सरकारनं महिलांवरील होणाऱ्या अत्याचारावर कठोर पावलं उचलावीत असा सल्ला राहुल गांधींनी दिला. राहुल गांधींसोबत प्रियांका गांधी, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल यांच्यासह हजारोंच्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते या मेणबत्ती मोर्चात सहभागी झाले होते. नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयापासून या मोर्चाला सुरूवात होऊन रात्री 1 च्या सुमारास हा मोर्चाचा समारोप झाला.

न्याय मिळेल : मेहबूबा मुफ्ती
“चिमुकलीला न्याय मिळवून देण्याच्या मार्गात कोणतीही अडचण येणार नाही. शिवाय, काही लोक किंवा गटांची बेजबाबदार वक्तव्य आणि कृती कायद्याच्या मार्गात अडथळा ठरणार नाही, याची खबरदारी घेऊ. योग्य ती कारवाई केली जाईल. वेगाने तपास करुन, न्याय दिला जाईल”, असे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी ट्वीटद्वारे सांगितलं.

संबंधित बातम्या

काश्मिरात चिमुकलीची बलात्कार करुन हत्या

उन्नाव गँगरेप प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला अटक

बलात्काराच्या घटनांविरोधात राहुल-प्रियांका मध्यरात्री रस्त्यावर

भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, असिफाच्या बलात्कारामागे पाकचा हात

कठुआ बलात्कार : फाशीसाठी पॉक्सोमध्ये बदल करणार : मेनका गांधी

उन्नाव प्रकरणातील गुन्हेगारांना सोडणार नाही : योगी आदित्यनाथ