नवी दिल्ली : विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असणारे शशी थरुर यांनी पुन्हा एक धक्कादायक विधान केलं आहे. मोदी हे शिवलिंगावर बसलेल्या विंचू सारखे आहेत. ज्याला हटवण्यासाठी हाताचा वापर करता येत नाही आणि चप्पलनेही मारुही शकत नाही, असं वादग्रस्त वक्तव्य शशी थरुर यांनी केलं आहे.


बंगळूरु येथे आयोजित लिटरेचर फेस्टिव्हलला थरुर यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी हे विधान केलं.


राष्ट्रीय स्वंयसेवक संघातील खास सूत्रांच्या हवाल्याने शशी थरुर म्हणाले की, "नरेंद्र मोदी यांना त्यांची प्रशंसा केलेली आवडते. यामुळे भाजप आणि राष्ट्रीय स्वयं संघामधील काही लोक नाराज आहेत. आरएसएसमधील लोकांना वाटतं की, मोदी शिवलिंगावर बसलेल्या विंचूप्रमाणे आहेत. ज्याला हटवण्यासाठी हातही लावता येत नाही आणि चपलेने मारताही येत नाही."


दरम्यान भाजप नेते आणि कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याप्रकरणाचा खरपूस समाचार घेतला. शिवलिंगावर चप्पल फेकण्याचं वक्तव्य करणं हिंदू धर्माचा अपमान आहे. स्वतःला शंकर भक्त म्हणणाऱ्या राहुल गांधी यांनी शशी थरुर यांच्या या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी, अशी मागणीही रविशंकर प्रसाद यांनी केली.