दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
खुराणा यांच्या निधनानंतर दिग्गज नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, "खुराणा हे दिल्ली भाजपचे मजबूत स्तंभ होते. त्यांचे निर्वासितांसाठीचे काम कायम लक्षात राहील", अशा शब्दात श्रद्धांजली अर्पण केली. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी ''दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते मदनलाल खुराणा हे आदर्श स्वयंसेवक, समर्पित विद्यार्थी परिषद कार्यकर्ता आणि जनसंघ तसेच भाजपाचे एक मजबूत स्तंभ होते", असे म्हटले आहे. सोबतच केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, स्मृती इराणी यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अनेक दिग्गजांनी खुराणा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
कोण होते मदनलाल खुराणा?
मदनलाल खुराणा 1993 ते 1996 या काळात दिल्लीचे मुख्यमंत्री होते. वाजपेयी सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्रीदेखील होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून भाजपात आलेल्या खुराणा यांनी राजस्थानच्या राज्यपाल पदाची धुरा देखील सांभाळली होती. त्यांचा जन्म 15 ऑक्टोंबर 1936 मध्ये पंजाबच्या लयालपूर गावात झाला होता. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर लयालपूर पाकिस्तानचा भाग झाला आणि फैसलाबाद असे त्याचे नामकरण झाले. खुराणा यांनी वयाच्या 12 व्या वर्षी लयालपूर येथून आपले घर सोडले आणि दिल्लीत आले. त्यांनतर ते इथेच रमले. विद्यार्थी दशेपासूनच त्यांचा राजकारणाशी संबंध आला. खुराणा यांचे राजकीय जीवन शेवटच्या काळात संघर्षाचे ठरले. खुराणा यांच्या मुलाचे मागील महिन्यात निधन झाले होते.