Shashi Tharoor: अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांची व्हाईट हाऊसमधील अनपेक्षित सलोख्याची भेट पाहून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी अप्रत्यक्ष पंतप्रधान मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना खोचक सल्ला दिला आहे. निवडणुकीत एकमेकांवर तुटून पडलेले नेते मतभेद बाजूला ठेवून देशाच्या हितासाठी एकत्र येऊ शकतात, अशी लोकशाहीची मूळ भावना भारतात अधिक प्रबळ व्हावी, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. थरूर म्हणाले की, लोकशाहीचे सौंदर्य हेच, निवडणुकीत विचारांवरून कठोर संघर्ष करा, पण निकाल लागल्यानंतर राष्ट्रहितासाठी एकत्र काम करण्याचे भान ठेवले पाहिजे. भारतात अशा चित्रांची कमतरता जाणवते आणि यासाठी स्वतःही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Continues below advertisement

ट्विट करत शशी थरुर काय म्हणाले?

थरुर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, लोकशाही अशीच असावी. निवडणुकीवेळी आपला विचार ठामपणे आणि उत्साहाने मांडावा. पण निवडणुका संपल्यावर आणि जनतेने आपला निर्णय दिल्यावर, देशाच्या हितासाठी एकत्र येऊन काम करायला शिकले पाहिजे. भारतात असे अधिक पाहायला मिळावे अशी इच्छा आहे आणि मी स्वतः त्यासाठी प्रयत्न करत आहे.

ट्रम्प यांचा मिश्किल सूर चर्चेचा विषय ठरला

दरम्यान, ट्रम्प ममदानी भेटीतील ‘सलोखा’ अमेरिकन राजकारणातील परिपक्वतेचे दर्शन घडवणारा ठरल्याचे थरूर यांना वाटते. निवडणुकीत सडकून टीका करणारे हे दोन्ही नेते भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना एकमेकांविषयी विश्वास व सहकार्य व्यक्त करताना दिसले. ममदानी यांनी पूर्वी ट्रम्पवर केलेल्या कडव्या आरोपांबद्दल प्रश्न विचारला असता, ट्रम्प यांनी घेतलेला मिश्किल सूरही चर्चेचा विषय ठरला. थरूर यांच्या वक्तव्याचे भाजपने स्वागत केले. प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेसनेही "देश प्रथम, घराणे नंतर" हा धडा शिकण्याची गरज असल्याचा टोला लगावला. राहुल गांधींना हा संदेश पोहोचेल का, असा उपरोधही त्यांनी केला. थरूर काँग्रेसमध्ये मुक्तपणे मत व्यक्त करणाऱ्या बंडखोर आवाजांपैकी एक आहेत. पण यामुळे ते वारंवार पक्षातील काही गटांच्या नाराजीला सामोरे जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचे कौतुक, भारतीय राजकारणातील घराणेशाहीवरची टीका किंवा बिहार निवडणुकीनंतरचे आत्मपरीक्षण या प्रत्येक भूमिकेमुळे थरूर यांनी स्वतःच्या पक्षातही खळबळ निर्माण केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या