नवी दिल्ली : देशातील राजकारण सध्या वाईट वळणार असल्याची चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. शिवाय, काही संघटनांना हाताशी घेऊन सत्ताधारी पक्ष वातावरण कलुषित करत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्रफुल्ल पटेल, डी पी त्रिपाठी, तारिक अन्वर, फौजिया खान, सुनील तटकरे, नवाब मलिक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
“मोदी सरकारने यूपीएच्याच काळातल्या अनेक योजनांची कॉपी केली आहे. आधार, मनरेगा, डायरेक्ट कॅश ट्रान्सफर या गोष्टींवर भाजप विरोधात असताना टीका करत होती.”, असे पवार म्हणाले.
“पीक विम्याच्या नावाखाली 16 हजार कोटी रूपयांचा प्रीमियम भरला. मात्र, प्रत्यक्षात केवळ 7 हजार कोटी रुपयेच शेतकऱ्यांना मिळाले. मग पीक विमा शेतकऱ्यांच्या फायद्याचा की विमा कंपन्याच्या?”, असा सवाल पवारांनी विचारला. शिवाय, डाळींचं भरघोस उत्पादन होणार, हे माहिती असूनही निर्यातबंदी वेळेत उठवली नाही, अशी टीकाही पवारांनी केली.
“मोदी सरकारचं दोन कोटी रोजगारांचं आश्वासन होतं. एमएसपीवर 50 टक्के शेतकऱ्यांना देऊ असंही म्हटलेलं. पण यातलं काहीच झालं नाही. शिवाय, गेल्या दोन वर्षात मिळून तीन लाख रोजगार उपलब्ध केले. मात्र, यूपीए काळात 2009 या एका वर्षात 10 लाख रोजगार दिले.” असेही शरद पवार म्हणाले.
पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना शरद पवार म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेशात मोठमोठी भाषणं देतात. आंतरराष्ट्रीय जगतात भारताचं स्थान वाढल्याचाही दावा केला जातो. पण त्याआधी यूनोचा रिपोर्ट पाहायला हवा, ज्यात अल्पसंख्यांकांवरचे हल्ले रोखण्यात सरकार अयशस्वी ठरल्याचा आरोप आहे. जबरदस्तीनं धर्मांतर होत असल्याचाही ठपका आहे.”