नवी दिल्ली : महाशिवआघाडी संदर्भात शरद पवार आणि सोनिया गांधींच्या भेटीकडे निर्णायक भेट म्हणून पाहिलं जातं आहे. या भेटीसाठी शरद पवार रविवारी दिल्लीत दाखल होणार आहेत. मात्र दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शरद पवार आज, रविवारी पुण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळं त्यांना दिल्लीला पोहोचण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. परिणामी शरद पवार आणि सोनिया गांधीची मुलाखत सोमवारी होणार असल्याचं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे. या बैठकीत महाशिवआघाडीसंर्भात ठोस निर्णय होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन होणार की नाही हे शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठका पार पडल्या आहेत. तिन्ही पक्षांनी मिळून सत्ता स्थापनेच्या दृष्टीने एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केला आहे.

या कॉमन मिनिमम प्रोग्रामचा प्राथमिक अहवाल तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना पाठवण्यात आला आहे. अहमद पटेल यांच्यामार्फत सोनिया गांधी यांच्याकडेही हा अहवाल पाठवण्यात आला आहे. त्यामुळे त्यावर उद्याच्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.

वेगवेगळ्या विचारसरणीचे हे पक्ष असल्याने सत्ता स्थापनेपूर्वी सर्व मुद्द्यांवर चर्चा करुण एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करणे गरजेचं होतं. त्यामुळेच सर्व विषयांवर चर्चा करुन सत्ता स्थापन करण्यास उशीर होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र तिन्ही पक्षांमध्ये सुरु असलेली चर्चा सकारात्मक असल्याची माहिती तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाशिवआघाडीचं सरकार राज्यात येण्याची अपेक्षा जनतेला आहे.