नवी दिल्ली मागील काही काळापासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उघडपणे उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. एका बाजूला काँग्रेस (Congress) आणि विरोधक अदानी समूहावर टीकास्त्र सोडत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) हे  उद्योजक गौतम अदानी यांना पूरक भूमिका घेत असल्याची चर्चा सुरू आहे. आज दिल्लीत झालेल्या राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतही  पवारांच्या भूमिकेबाबत राहुल गांधींना प्रश्न करण्यात आला. त्यावर राहुल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.



जानेवारी महिन्यात अदानी समूहाच्या व्यवहारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या हिंडेनबर्ग या रिसर्च फर्मचा अहवाल समोर आल्यानंतर काँग्रेस आणि विरोधक आक्रमक झाले होते. त्यानंतर अदानी समूहाच्या व्यवहाराची संसदेच्या संयुक्त चौकशी समितीकडून चौकशीची मागणी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी या मागणीला पाठिंबा दर्शवला नाही. या उलट पवार यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर शरद पवार यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित करण्यात आल्या. विरोधकांच्या इंडिया आघाडीची मोट बांधल्यानंतर शरद पवार यांनी अदानी समूहाच्या एका कार्यक्रमातही हजेरी लावल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.    


शरद पवारांबाबत राहुल गांधी यांनी काय म्हटले?


राहुल गांधी यांना आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. अदानींसोबत झालेल्या बैठकीबाबत तुम्ही पवार यांना विचारणा केली का, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर राहुल गांधी म्हटले की, मी शरद पवार यांना  हा प्रश्न विचारला नाही. शरद पवार हे भारताचे पंतप्रधान नाहीत आणि ते अदानींचा बचाव करत नाहीत. पवार पंतप्रधानपदावर असते तर मी प्रश्न विचारला असता. सध्या पंतप्रधानपदावर मोदी असून ते अदानींचा बचाव करत आहेत. त्यामुळे त्यांना प्रश्न विचारणार असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. 


शरद पवार आणि उद्योजक गौतम अदानी यांचे चांगलेच संबंध आहेत. पवार यांचे राजकीय आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती मध्ये शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्या मेहनतीचे कौतुक केले होते. अदानी यांनी जून महिन्यात पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. 


 


राहुल गांधी यांच्याकडून अदानी लक्ष्य


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अदानी समूहाला लक्ष्य करत आरोप केले आहेत. वीज महाग होण्यामागे अदानीच कारणीभूत असून त्यांनी 32 हजार कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. अदानी समूह इंडोनेशियातून कोळसा खरेदी करतात आणि भारतात दुप्पट दराने कोळसा विक्री करतात, असे राहुल गांधी यांनी म्हटले. 


राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत अदानी समूहाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. देशातील नागरिकांनी वीजेचे स्विच ऑन करताच अदानींच्या तिजोरीत पैसे जमा होतात. अदानींना पंतप्रधान मोदी संरक्षण देत आहेत. जगातील इतर देशांमध्ये अदानींच्या व्यवहाराची चौकशी होत आहे. मात्र, भारतात अदानींना कोरा चेक दिला असल्याची टीका राहुल यांनी केली. त्यांना जे काही करायचे आहे ते करू देत, परंतु लोकांनी 32 हजार कोटींचा आकडा लक्षात ठेवावा असे आवाहन करताना पंतप्रधान मोदी अदानींची चौकशी का करत नाही, असा सवालही राहुल गांधी यांनी केला.