नवी दिल्ली काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अदानी समूहाला (Adani Group)  लक्ष्य करत आरोप केले आहेत. वीज महाग होण्यामागे (Power Tariff) अदानीच कारणीभूत असून त्यांनी 32 हजार कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. अदानी समूह इंडोनेशियातून कोळसा (Coal Buying) खरेदी करतात आणि भारतात दुप्पट दराने कोळसा विक्री करतात, असे राहुल गांधी यांनी म्हटले. 


राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत अदानी समूहाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. देशातील नागरिकांनी वीजेचे स्विच ऑन करताच अदानींच्या तिजोरीत पैसे जमा होतात. अदानींना पंतप्रधान मोदी संरक्षण देत आहेत. जगातील इतर देशांमध्ये अदानींच्या व्यवहाराची चौकशी होत आहे. मात्र, भारतात अदानींना कोरा चेक दिला असल्याची टीका राहुल यांनी केली. त्यांना जे काही करायचे आहे ते करू देत, परंतु लोकांनी 32 हजार कोटींचा आकडा लक्षात ठेवावा असे आवाहन करताना पंतप्रधान मोदी अदानींची चौकशी का करत नाही, असा सवालही राहुल गांधी यांनी केला. अदानी हे देशातील गरिबांना लूटत असून त्यांच्या खिशावर दरोडा टाकत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. 


माध्यमांवर राहुल गांधीचे प्रश्न 


प्रसारमाध्यमांवर प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, कोळशाच्या चुकीच्या किमती दाखवून अदानींनी आधीच विजेचे दर वाढवून जनतेकडून १२ हजार कोटी रुपये वसूल केले आहेत. विजेच्या वाढत्या किमतीमागे अदानीचा हात आहे. यावर माध्यमे प्रश्न उपस्थित करत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. अशा बातम्यांमुळे सरकार पडते. आम्ही कर्नाटक आणि राजस्थानमधील लोकांना सबसिडी देत ​​आहोत तर अदानी किंमत वाढवत आहे. पंतप्रधान गप्प का?



ओसीसीआरपीच्या अहवालात अदानींवर निशाणा


ओसीसीआरपी म्हणजे दी ऑर्गनाईज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (The Organised Crime and Corruption Reporting Project -OCCRP) या स्वयंसेवी संस्थेने ऑगस्ट महिन्यात अदानी समूहाच्या व्यवहारावर अहवाल प्रकाशित केला होता. अदानी समूहातील गुंतवणुकीवर यामध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. 


अदानी समूहात 2013  ते 2018 दरम्यान झालेल्या गैरव्यवहारामागे बरेच गुंतागुंतीचे व्यवहार आहेत. हे सहजासहजी कुणाच्याही लक्षात येणार नाहीत, असंही ओसीसीआरपीने म्हटलंय. या आरोपांमागे त्यांनी बराच तपास केल्याचाही दावा केला आहे. मॉरिशसमधील दोन फंड (विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार) यामध्ये सहभागी होते. या दोन्ही फंडाचे व्यवस्थापक हे अदानी कुटुंबीयाचेच व्यावसायिक भागीदार असल्याचा दावाही करण्यात आला आहे. 



अदानी समूहाचे संस्थापक असलेल्या गौतम अदानी यांचे ज्येष्ठ बंधू विनोद अदानी यांचे दोन निकटचे सहकारी या मॉरिशसमधील गुंतवणूकदार संस्थाचे सर्वेसर्वा होते. त्यांच्यामार्फत भारतीय शेअर बाजारातील अदानी समूहांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली. दुबईचे नासर अली शाबान अहली आणि तैवानच्या चेंग चुंग-लींग या विनोद अदानी यांच्या सहकाऱ्यांनी वर्षानुवर्षे मॉरिशसमधील गुंतवणूकदार संस्थाचा पैसा भारतात अदानी समूहाच्या कंपन्यात गुंतवला. हे व्यवहार दुबई आणि मॉरिशस येथील विनोद अदानी यांचे कर्मचारी असलेल्या नासर अहली आणि चेंग चुंग-लींग यांच्या देखरेखीखाली चालायचे असा ओसीसीआरपीचा आरोप आहे.