नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा अवमान झाला का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. शपथविधीसाठी आमंत्रित शरद पवारांना चक्क पाचव्या रांगेचा पास देण्यात आला होता. शरद पवारांच्या कार्यालयाने यासंदर्भात लक्ष वेधूनही आसनव्यवस्था बदलून देण्यात न आल्यामुळे पवारांनी उपस्थिती लावली नाही, अशी माहिती आहे.


नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, अरविंद केजरीवाल यांच्यासारखे प्रमुख विरोधक उपस्थित राहिले होते. त्यांना पहिल्या किंवा पुढच्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं. माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री या नात्याने शरद पवारांना पुढच्या रांगेत स्थान अपेक्षित होतं. मात्र पाचव्या रांगेतला पास देऊन पवारांचा अवमान करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

विशेष म्हणजे शरद पवारांच्या कार्यालयाने या गोष्टीकडे लक्षही वेधलं होतं. मात्र तरीही त्यांना आसनव्यवस्था बदलून देण्यात न आल्यामुळे नाराज झालेल्या पवारांनी शपथविधीला हजेरी लावली नाही, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या प्रचारात शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगलं होतं. एकीकडे पवारांचं बोट धरुन राजकारणात आल्याचं सांगणारे मोदी त्यांच्यावरच चिखलफेक करताना दिसले. त्यामुळे मोदी सरकारने हे जाणूनबुजून केल्याचं मानलं जात आहे.



राष्ट्रपती भवनाच्या साक्षीने मोदी सरकारच्या दुसऱ्या सत्तापर्वाचा आज शुभारंभ झाला. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, सदानंद गौडा, निर्मला सीतारमन यांच्यासह 58 मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली. महाराष्ट्रातून शिवसेना खासदार अरविंद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, रामदास आठवले यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली. मोदी 2.0 सरकारच्या खातेवाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सात वाजता विविध पक्षांचे दिग्गज नेते, कलाकार, उद्योगपती यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा रंगला. लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंह, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यासारख्या नेत्यांसह अंबानी कुटुंब, शाहरुख खान, करण जोहर, कंगना राणावत यासारखे कलाकार उपस्थित होते.

मराठीतून शपथ घ्यावी, अशी मागणी सर्वसामान्यांनी सोशल मीडियावरुन उचलून धरली होती. त्यानंतर अरविंद सावंत यांनी मराठीतून शपथ घेण्याचं कबूलही केलं, मात्र सावंत, दानवे, गडकरी, आठवले यांनी हिंदीतूनच शपथ घेतली.