Shanti Swarup Bhatnagar Award : शांती स्वरूप भटनागर पुरस्कारांची (Shanti Swarup Bhatnagar Award) घोषणा झाली आहे. देशातील 12 तरुण शास्त्रज्ञांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) वर्ष 2022 साठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कारांची घोषणा केली आहे. हा पुरस्कार दरवर्षी ४५ वर्षांखालील शास्त्रज्ञांना दिला जातो. यामध्ये पाच लाख रुपयांचे पारितोषिक आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे.   


CSIR चे पहिले महासंचालक शांती स्वरूप भटनागर यांच्या नावाने दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. दरवर्षी सात वैज्ञानिक विषयांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. यामध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी आणि पृथ्वी (महासागर आणि ग्रह विज्ञान)  या अंतर्गत उत्कृष्ट संशोधकांना हे पुरस्कार दिले जातात. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झालेल्या 12 शास्त्रज्ञांनांपैकी दोन शास्त्रज्ञ मुंबईचे आहेत.  


या 12 शास्त्रज्ञांचा होणार सन्मान


जैविक विज्ञान


जैविक विज्ञान या क्षेत्रासाठी CSIR-इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबियल टेक्नॉलॉजीचे डॉ. अश्विनी कुमार आणि सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग डायग्नोस्टिक्सचे डॉ. मद्दिका सुब्बा रेड्डी यांना संयुक्तपणे शांती स्वरूप भटनागर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  


रसायनशास्त्र


रसायनशास्त्रासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे डॉ. अक्कट्टू टी बिजू आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मुंबई) चे डॉ. देबब्रता मैती यांना संयुक्तपणे शांती स्वरूप भटनागर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  


पृथ्वी, वातावरण आणि ग्रह विज्ञान


पृथ्वी, वातावरण आणि ग्रह विज्ञान या क्षेत्रासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (गांधीनगर) च्या डॉ. विमल मिश्रा यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 


अभियांत्रिकी विज्ञान


अभियांत्रिकी विज्ञान क्षेत्रासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (दिल्ली) च्या डॉ. दिप्ती रंजन साहू आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मद्रास) चे डॉ. रजनीश कुमार यांना संयुक्तपणे शांती स्वरूप भटनागर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 


गणितशास्त्र


गणितशास्त्रामध्ये भारतीय विज्ञान संस्थेचे डॉ. अपूर्व खरे आणि मायक्रोसॉफ्ट रिसर्च लॅबचे डॉ. नीरज कायल यांना संयुक्तपणे शांती स्वरूप भटनागर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 


वैद्यकीय विज्ञान


वैद्यकीय विज्ञान क्षेत्रासाठी CSIR इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजीचे डॉ. दिप्यमन गांगुली यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 


भौतिक विज्ञान


भौतिक विज्ञान या क्षेत्रासाठी भारतीय विज्ञान संस्थेचे डॉ. अनिंद्य दास आणि भौतिकशास्त्र टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे डॉ. बासुदेव दासगुप्ता यांना संयुक्तपणे शांती स्वरूप भटनागर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


दिलीप वेंगसरकरांना जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण