कर्नाटक : कर्नाटकात (Karnataka) सध्या डेंग्यूचे (Dengue) प्रमाण वाढत असल्याचं चित्र आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामैया (CM siddaramaiah) यांनी सोमवारी ( 11 सप्टेंबर) म्हटलं की, या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी योग्य उपायोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. तर डेंग्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. तर लोकांच्या घराभोवती स्वच्छतेला प्राधान्य देण्याचं आवाहन मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी केलं आहे. 


राज्यभरात सात हजार डेंग्यूचे रुग्ण


मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की, मागील काही दिवसांत राज्यभरात डेंग्यूचे सात हजारपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी चार हजारपेक्षा अधिक रुग्ण हे एकट्या बंगळूरुमध्ये आहेत. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. तसेच त्यांना योग्य ती खबरदारी घेऊन आवश्यक त्या उपायोजना करण्याच्या सूचना देखील दिल्यात. तर शहरामध्ये डासांच्या नियंत्रणासाठी स्वच्छता राखण्याचे काम करण्यात येत आहे. 



डेंग्यूला घाबरु नका, जागरुक राहा - कर्नाटक मुख्यमंत्री


मुख्यमंत्र्यांनी पुढे बोलतांना म्हटलं की, मी जनतेला त्यांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि प्राथमिक उपाययोजनेचे पालन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करतो. डेंग्यूला घाबरु नका, जागरुक राहा.  कर्नाटकाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडू राव यांनी शुक्रवारी   रोगनिरीक्षण डॅशबोर्डाची सुरुवात केली. तसेच नागरिकांच्या मदतीसाठी एक मोबाईल अॅप देखील सुरु करण्यात आले आहे.


मोबाईल अॅपची सुरुवात


राज्य सरकारकडून सुरु करण्यात आलेले हे अॅप फक्त डेंग्यू रोगावर लक्ष केंद्रीत करत आहेत. भविष्यात आणखी रोगांसाठी हे अॅप उपलब्ध करुन देण्याचा राज्य सरकारचा मानस असेल. सध्या हे अॅप सध्या तरी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आले आहे. तर लवकरच हे अॅप नागरिकांसाठी देखील उपलब्ध करुन देण्यात येईल. 


सध्या राज्य सरकारकडून रोगावर नियंत्रण मिळण्यासाठी उपायोजना करण्यात येत आहेत. या अॅपवरुन अधिकाऱ्यांना चार आठवड्यांपर्यंत ज्या भागांमध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे त्या भागाविषयी माहिती पुरवेल. तसेच योग्य उपाययोजना करण्यासाठी आणि माहिती व्यवस्थित ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांना मदत होईल. पण यामध्ये नागरिकांनी देखील योग्य काळजी घेण्याची गरज असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या या रोगावर नियंत्रण मिळवणं हे राज्य सरकारसमोर मोठं आव्हान आहे. तर राज्य सराकार यावर आणखी कोणती कठोर पावलं उचलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हेही वाचा : 


Chandrababu Naidu Arrest: चंद्राबाबू नायडू न्यायालयीन कोठडीत, अटकेच्या निषेधार्थ आज आंध्रप्रदेश बंदची हाक, आतापर्यंत काय-काय घडलं?