शक्तिमानचा पाय कापला
देहराडूनमध्ये महिन्याभरापूर्वी झालेल्या भाजपच्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या सेवेत असलेल्या शक्तिमानचा पाय लोखंडी अँगलमध्ये अडकून मोडला होता. यानंतर त्याचा पाय कापावा लागला होता. शरीरात संसर्ग होऊ नये, यासाठी शस्त्रक्रिया करुन घोड्याचा पाय शरीरापासून वेगळा केला आणि त्याला कृत्रिम पाय लावला होता.
डॉक्टरांच्या टीमची अथक मेहनत
शक्तिमानला पुन्हा आपल्या पायांवर उभं करण्यासाठी डॉक्टरांची एक टीम रात्रंदिवस झटत आहे. मात्र जास्त वजनामुळे त्याला व्यवस्थित उभं राहता येत नव्हतं. त्यामुळे दुसरा कृत्रिम पाय बनवण्याची ऑर्डर अमेरिकेत दिली होती. शक्तिमानचं ऑपरेशन केलेल्या अमेरिकेच्या डॉक्टर जेनी मेरी वॉन यांनी हा पाय एका व्यक्तीद्वारे मागवला. त्यानंतर शनिवारी रात्री उशिराच त्याला हा पाय लावण्यात आला.
शक्तिमानला सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. शक्तिमानच्या दुसऱ्या पायावर जास्त भार पडू नये, यासाठीही डॉक्टरांनी काही उपाययोजना केल्या आहेत.
दरम्यान, शक्तिमान मागील 11 वर्षांपासून पोलिस दलात सेवा करत आहे.