पणजी :  जर एखादी महिला आणि पुरुष यांच्यामध्ये दृढ प्रेमसंबंध असल्याचा पुरावा असेल, तर त्यांच्यातील शारीरिक संबंधांप्रकरणी पुरुषाला बलात्काराचा दोषी ठरवता येणार नाही, असं मत मुंबई हायकोर्टाच्या गोवा शाखेने नोंदवलं.

लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपीला सात वर्षांचा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला होता, मात्र हायकोर्टाने ही शिक्षा स्थगित केली.

कॅसिनोमध्ये काम करणारा आरोपी आणि तक्रारदार महिलेची 2013 मध्ये ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. शेफ असलेल्या आरोपीने महिलेला कुटुंबीयांशी ओळख करुन देण्यासाठी घरी नेलं. मात्र त्याच्या घरी त्यावेळी कोणीच नव्हतं.

तक्रारदार महिला त्या रात्री आरोपीच्या घरीच राहिली. दोघांमध्ये शारीरिक संबंध आले. दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपीने तिला घरी सोडलं. त्यानंतरही तीन ते चार वेळा दोघांमध्ये शरीरसंबंध आले.

महिला कनिष्ठ जातीची असल्याचं कारण सांगून आरोपीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर महिलेने बलात्काराची तक्रार दिली. आरोपीने लग्नाचं वचन दिल्यामुळे आपण शारीरिक संबंध ठेवण्यास संमती दिल्याची कबुली तिने दिली. महिलेने आरोपीला आर्थिक पाठबळ दिल्याचंही समोर आलं.

'पुरावे पाहता, शारीरिक संबंधांना दिलेली संमती ही केवळ लग्नाच्या वचनामुळे नाही, तर प्रेमसंबंधांमुळे होती.' असं जस्टिस सी व्ही भडंग यांनी सांगितलं. 'शारीरिक संबंधांनंतरही दोघांमध्ये रिलेशनशीप होती. तक्रारदार महिला आरोपीला आर्थिक मदत करत होती आणि दोघांमध्ये तीन ते चार वेळा शारीरिक संबंध आले. त्याची परिस्थिती पाहता, तो महिलेवर दडपण आणून लैंगिक छळ करत होता, असे म्हणता येणार नाही.' असंही जस्टिस भडंग यांनी स्पष्ट केलं.