Elaben Bhatt passes away : महिला अधिकार कार्यकर्त्या आणि सेवा संस्थेच्या संस्थापक, पद्मभूषण इला भट्ट (Elaben Bhatt) यांचं निधन झालं. इला भट्ट यांनी वयाच्या 89 व्या अहमदाबाद येथील हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुले अमिमायी आणि मिहीर आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. सेवा संस्थेकडून ट्वीट करत इला भट्ट यांच्या निधनाचं वृत्ताला दुजोरा दिलेला आहे. गांधीवादी विचारसरणीचा पगडा इला भट्ट यांच्यावर होता. सेवा भारत संस्थेनं ट्वीट करत म्हटले की, 'महिला कामगारांच्या अधिकारांसाठी कायमच लढा देणाऱ्या आपल्या संस्थापक इलाबेन भट्ट यांचं निधन झालं आहे. यामुळे आपल्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करुयात.' इला भट्ट यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्वीट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
भारतामधील असंघटित महिला कामगारांच्या हक्कासाठी इला भट्ट यांनी काम केलं आहे. स्वयंरोजगार करणाऱ्या महिला कामगारांना एकत्र करत त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी इला भट्ट यांनी काम केलं. महिलांना अधिकार मिळवून देण्यासाठी इला भट्ट यांनी अनेक सहकार चळवळीत आवाज उठवला. इला भट्ट यांनी 1972 मध्य स्वाश्रय महिला सेवा संघ (सेवा) नावाची संस्था स्थापन केली. सन 1972 ते 1996 त्या संस्थेच्या सरचिटणीस होत्या. आंतरराष्ट्रीय कामगार, महिलांच्या प्रश्नांशी संबंधित अनेक चळवळींमध्ये इला भट्ट यांनी सहभाग घेतला होता. इला रमेश भट्ट यांचा जन्म गुजरातमधील सुरतमध्ये 1933 मध्ये झाला आहे.
गांधीवादी विचाराच्या इला भट्ट यांना अतुलनीय कामासाठी अनेक पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. भारत सरकारकडून इला भट्ट यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. त्याशिवाय त्यांच्या उल्लेखनीय कार्यबद्दल त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार, राईट लाईव्हलीहुड अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. त्याशिवाय 2011 मध्ये इला भट्ट यांना गांधी शांतता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे. तर 1985 मध्ये पद्मश्री आणि 1986 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
गांधीवादी विचारांच्या इला भट्ट यांचं निधन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्वीट करत दुःख व्यक्त केले आहे.