नवी दिल्ली : योग्य सुविधा न मिळाल्यास आपण मोबाईलमधील सिमकार्ड बदलतो. त्याचप्रमाणे आता आपल्या केबल नेटवर्क ऑपरेटरने चांगल्या सुविधा दिल्या नाहीत किंवा ती कंपनी मनमानी कारभार करत असेल तर आपण सेट-टॉप बॉक्समधील कार्डही बदलून दुसऱ्या कंपनीचे कार्ड वापरु शकतो. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) येत्या काळात या प्रणालीची अंमलबजावणी करणार आहे.

जे ग्राहक आताच्या डीटीएच ऑपरेटर कंपनीला कंटाळले आहेत त्यांना दिलासा मिळणार आहे. ट्रायने ही नवी प्रणाली वापरात आणल्यानंतर सेट टॉप बॉक्सच्या कंपन्या, डीटीएच कंपन्यांच्या मनमानी कारभाराला आळा बसेल, असे बोलले जात आहे.

सध्या आपण केबल ऑपरेटर किंवा कंपनीने दिलेला सेट टॉप बॉक्स आणि कार्ड वापरतो. सेट टॉप बॉक्समुळे ग्राहकांना कंपनी बदलण्यात अडथळे येतात. ट्रायच्या नव्या निर्णयामुळे ग्राहकांची होणारी कुचंबणा थांबेल. दरम्यान डीटीएच कंपन्या व केबल सेवा पुरवठादारांकडून ट्रायच्या या प्रस्तावाला तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करणे ट्रायला कठीण जाणार आहे. परंतु या वर्षअखेरपर्यंत नवी प्रणाली आमलात आणण्याचा ट्रायचा प्रयत्न असेल.

प्रत्येक डीटीएच कंपनीचा सेट टॉप बॉक्स वेगवेगळा आहे. त्यामध्ये टेक्निकल (तांत्रिकदृष्ट्या) फरक आहे. त्यामुळे जर त्यामधील कार्ड बदलले तर दुसऱ्या कंपनीची पायरसी व इतर तांत्रिक बाबींचा गोंधळ होण्याची शक्यता कंपन्यांकडून वर्तवण्यात येत आहे. प्रत्येक कंपनीचे सेट टॉप बॉक्समधील सॉफ्टवेअर्स वेगवेगळे असल्याने एका कंपनीच्या सेट टॉप बॉक्समधून दुसऱ्या कंपनीची सेवा पुरवणे अवघड जाऊ शकते, असे कंपन्यांनी म्हटले आहे.

सेट-टॉप बॉक्सशी छेडछाड झाल्यास कंपन्यांची माहिती चोरी होऊ शकते, असा युक्तीवाद करत डीटीएच कंपन्यांनी ट्रायच्या या नव्या निर्णयाला विरोध केला आहे. डीटीएच कंपन्यांचे सर्व युक्तीवाद ऐकल्यानंतर ट्रायने यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.