नवी दिल्ली : जीएसटी परिषदेने महागड्या गाड्या, एसयूव्ही आणि मध्यम किंमतीच्या गाड्यांवरील सेस 2 ते 7 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर खादी ग्रामोद्योग केंद्रांमध्ये विकल्या जाणाऱ्या खादीच्या वस्तू जीएसटीतून मुक्त केल्या आहेत. शिवाय मातीच्या मूर्ती, अगरबत्ती, रबर बँड आणि रेनकोट यांसारख्या 30 वस्तूंवरील जीएसटीचा दर कमी केला आहे. या 30 वस्तूंवरील दर कमी केल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल, असा दावा सरकारने केला आहे. दरम्यान महागड्या गाड्यांवर सेस वाढवण्यात आला असला तरी देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने दर न वाढवण्याचे संकेत दिले आहेत. हैदराबादमध्ये जीएसटी परिषदेची 21 वी बैठक पार पडली. यामध्ये सर्वांचं लक्ष गाड्यांवरील सेसकडे होतं. 20 व्या बैठकीत सेस 10 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर कायद्यात फेरबदल करण्यासाठी राष्ट्रपतींनी अध्यादेशही जारी केला होता.
वस्तू जुने दर (टक्क्यांमध्ये) नवीन दर (टक्क्यांमध्ये)
अक्रोड 12 5
चणा डाळ 12 5
कस्टर्ड पावडर 28 18
इडली-डोसे यांसाठी लागणाऱ्या वस्तू 18 12
पुजा साहित्य, अगरबत्ती 12 5
जप करण्याची माळ 18 5
यज्ञ सामग्री जो दर असेल तो 5
प्लॅस्टिक रेन कोट 28 18
रबर बँड 28 12
खादी ग्रामोद्योग केंद्रांमध्ये विकले जाणारे कपडे 5 0
साडी फॉल 12 5
मातीच्या मूर्ती 28 0
लाकूड, दगड आणि धातूंच्या मूर्ती 28 12
20 इंच आकारापर्यंतचा कम्प्यूटर मॉनिटर 28 18
कापूस 18 5 (1000 हजार रुपयांपर्यंत) 12 (1000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीवर)
झाडू 5 0
किचन गॅस लायटर 28 18
  जीएसटी परिषदेच्या बैठकीतील निर्णय
  • पेट्रोल आणि डीझेल कारवर पहिल्याप्रमाणेच सेस आणि जीएसटी मिळून कराचा दर 29 ते 31 टक्के असेल.
  • मध्यम श्रेणीतील कारवर सेस मिळून जीएसटीचा दर 43 टक्क्यांऐवजी 45 टक्के असेल. म्हणजेच सेस 2 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.
  • मोठ्या किंमतीच्या कारवर सेस मिळवून जीएसटीचा दर 43 टक्क्यांऐवजी 48 टक्के असेल. म्हणजेच सेस 5 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.
  • एसयूव्हीवर सेस मिळवून जीएसटीचा दर 43 टक्क्यांऐवजी 50 टक्के असेल. म्हणजेच सेस 7 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.
  • हायब्रीड कारवर पहिल्याप्रमाणेच सेस आणि जीएसटी मिळून कराचा दर 42 टक्केच असेल.