ओदिशा : ओदिशाच्या जाजपूर भागात रविवारी दहा कापलेले हातांचे अवशेष अढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे हातांचे अवशेष 2006 मध्ये पोलिस फायरिंगमध्ये मारले गेलेल्या आदिवासींचे असू शकतात, असा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत असून, त्या भागात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


आदिवासी समाजाने 2006 मध्ये कलिंगा नगरमधील स्टील प्लांटसाठीच्या भूमी अधिग्रहणाविरोधात आंदोलन केलं होत. या दरम्यान आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात 13 पेक्षा अधिक आदिवासी मारले गेले होते. त्यापैकी 5 आदिवासींचे हे हात असल्याचा पोलिसांनी सांगितल.

मारले गेलेल्या आदिवासींचे शवविच्छेदन करण्यात आले होते. त्यात 5 आदिवासींचे ओळख पटत नसल्यामुळे त्यांचे हात कापून बोटाचे ठसे घेण्यात आले होते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते हात त्यांच्या कुटूंबियांना सोपवण्यात आले होते, मात्र कुटुंबियांनी घेण्यास नकार दिला होता. त्यांनी या हातांची डीएनए टेस्ट करण्याची मागणी केली होती. त्यासाठी या हातांना एका क्लबमधील मेडिकल बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते.

काही टवाळखोरांनी शनिवारी क्लबची खिडकी तोडून मेडिकल बॉक्स पळवले होते. त्याच बॉक्समध्ये हे 10 हात होते, अशी माहिती पोलिस अधीक्षक सी.एस मिना यांनी दिली. तसेच टवाळखोरांनी हे 10 हात जाजपूर भागात फेकले, त्यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले, असे पोलिस अधीक्षक म्हणाले.

या प्रकरणी अजूनपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, या प्रकारामुळे जाजपूर भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.