नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार आणि 'द वायर'चे संपादक विनोद दुवा यांचे आज निधन झालं. त्यांची मुलगी मल्लिका दुवा यांनी ही माहिती दिली आहे. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मल्लिका दुवा यांनी दिली आहे.  


 






विनोद दुवा यांची कन्या आणि अभिनेत्री मल्लिका दुवा यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करुन ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या स्टोरीमध्ये लिहिलं आहे की, "एक निडर आणि असाधारण पिता विनोद दुवा यांचं निधन झालं आहे. ते एक असाधारण जीवन जगले आहेत. दिल्लीतील निर्वासितांच्या कँपमधून सुरु झालेला त्यांचा प्रवास हा 42 वर्षे पत्रकारितेतील अनेक शिखरं पार करण्यापर्यंत झाला. या काळात ते नेहमी सत्य बोलत राहिले. ते आता आमची आई, त्यांची पत्नी चिन्ना यांच्यासोबत स्वर्गात जातील. त्या ठिकाणी ते गाणे गातील, जेवन बनवतील आणि नव्या प्रवासासाठी एकमेकांची सोबत देतील."


विनोद दुवा यांना या वर्षीच्या सुरुवातीला कोरोनाची लागण झाली होती. गेल्या आठवड्यात त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं. 



तब्बल 42 वर्षाहून अधिक पत्रकारिता
विनोद दुवा यांची पत्रकारिता आजही अनेकांसाठी आदर्शवत अशीच आहे. त्यांनी जवळपास 42 वर्षाहून पत्रकारिता केली आहे. विनोद दुवांचे महत्वपूर्ण योगदान म्हणजे त्यांनी सर्वसामान्यांना समजणाऱ्या भाषेत निवडणुकांचं विश्लेषणाला सुरुवात केली. त्यानंतर हिंदी आणि इतर भाषांमध्ये हा ट्रेन्ड सुरु झाला. विनोद दुवा यांनी दूरदर्शनासहित अनेक टीव्ही चॅनेल्सवर बातमीदारी केली होती. 


 





विनोद दुवा यांची कारकीर्द



  • विनोद दुवा यांनी प्रणय रॉय यांच्यासोबत 1984 साली दूरदर्शनवर निवडणूक विश्लेषणाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला वेगळी दिशा मिळाली.

  • 1992 साली झी टीव्हीमध्ये काम सुरु केलं. 

  • 1996 साली विनोद दुवा यांना रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्काराने गौरवण्यात आलं.

  • 1998 साली त्यांनी सोनी टीव्हीवर चुनाव चुनौती हा कार्यक्रम सुरु केला. 

  • 2000 ते 2003 दरम्यान सहारा वाहिनीमध्ये काम केलं. 

  • झायका इंडिया का हा एनडीटीव्हीवरील कार्यक्रम त्यानी होस्ट केला. 

  • 2008 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं.

  • 2017 साली पत्रकारितेतील रेड इंक पुरस्कार देण्यात आला. 

  • त्यांनी एसडब्लू न्यूजचे सल्लागार संपादक म्हणून काम केलं. 

  • त्यांनी द वायर वर जन गण मन की बात हा कार्यक्रम सुरु केला. 


भाजप नेत्याने दाखल केला देशद्रोहाचा गुन्हा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरुद्ध आपल्या यूट्यूब चॅनेलमधून टीका केल्यामुळे हिमाचल प्रदेशमधील एका भाजप नेत्याने विनोद दुआ यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर  देशातल्या प्रत्येक पत्रकाराला केदारनाथ निवाड्याचं घटनादत्त संरक्षण आहे, असं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले होते. 


महत्त्वाच्या बातम्या :