Ved Pratap Vaidik Death: ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक (Ved Pratap Vaidik) यांचं आज (14 मार्च) सकाळी निधन झालं. त्यांचे पीए मोहन यांनी यासंदर्भात माहिती दिली. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ते राहत्या घरातील बाथरुममध्ये पाय घसरुन पडले, त्यानंतर लगेचच त्यांना घराजवळील प्रतीक्षा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, वयाच्या 78व्या वर्षी वेद प्रताप वैदिक यांनी अखेरचा श्वास घेतला.


वेद प्रताप वैदिक हे हिंदी भाषेतील प्रसिद्ध पत्रकार होते. त्यांनी वयाच्या 78व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि दहशतवादी हाफिज सईदची मुलाखत घेतल्यानंतर वेद प्रताप वैदिक चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांच्या मुलाखतीची खूप चर्चा झाली होती.


शिक्षक ते पत्रकार, असा होता वेद प्रताप वैदिक यांचा प्रवास 


ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांचा जन्म 30 डिसेंबर 1944 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला होता. त्यांनी जेएनयूमधून आंतरराष्ट्रीय राजकारणात पीएचडी केली. ते चार वर्षे दिल्लीत राज्यशास्त्राचं शिक्षक म्हणून काम पाहत होते. त्यांना तत्त्वज्ञान आणि राजकारणातही खूप रस होता. हरियाणातील गुडगाव जिल्ह्यात आपल्या राहत्या घरात वयाच्या 78व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.


"...तर त्या संसदेवर थुंकतो"; या वक्तव्यामुळे चर्चेत आलेले वेद प्रताप वैदिक


ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांनी मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि दहशतवादी हाफिज सईद याची एक मुलाखत घेतली होती. ती मुलाखत राजकीय वर्तुळासह संपूर्ण देशभरात गाजली होती. हाफिज सईदच्या मुलाखतीनंतर संपूर्ण देशभरात गोंधळ झाला होता. त्यावेळी दोन खासदारांनी वेद प्रताप वैदिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी केली होती. यावर वेद प्रताप वैदिक यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच, याप्रकरणी बोलताना मी केवळ दोन खासदारांनीच नाही, तर संपूर्ण 543 खासदारांनी एकमताने ठराव करुन मला फाशी द्यावी. मी अशा संसदेवर थुंकतो," असं म्हणत आपली प्रतिक्रिया दिली होती. 


अनेक भाषांमध्ये पारंगत होते वेद प्रताप वैदिक


दिवंगत पत्रकार वेद प्रताप वैदिक हे आतापर्यंतच्या सर्वात सक्षम संपादकांपैकी एक मानले जातात. वैदिक यांनी 'नवभारत टाइम्स'चे संपादकीय पानांचे प्रमुख म्हणून त्यांनी 12 वर्ष काम पाहिलं. याशिवाय त्यांनी अफगाणिस्तानवर केलेलं संशोधन आजही चर्चेत असतं. वैदिक 'पीटीआय भाषा'चे संस्थापक-संपादकही होते. याशिवाय ते लंडन, मॉस्कोसह 50 हून अधिक देशांमध्ये फिरले होते. अनेक भाषांमध्येही ते पारंगत होते.