मोहाली : बंगळुरुत ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका पत्रकाराची हत्या केल्याची घटना घडली आहे. पंजाबमधील मोहालीत ज्येष्ठ पत्रकार केजे सिंह आणि त्यांच्या आईचा मृतदेह आढळून आला आहे. दोघांच्याही गळ्यावर जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
केजे सिंह 60 वर्षांचे होते. तर त्यांच्या आई गुरुचरण कौर यांचं वय 92 वर्षे होतं. चंदीगडमध्ये केजे सिंह यांनी इंडियन एक्स्प्रेस, ट ट्रिब्यून आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये वृत्त संपादक म्हणून काम केलं आहे.
केजे सिंह यांच्या गळ्यावर वार केल्याच्या खुणा आहेत. तर त्यांच्या आई गुरुचरण कौर यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या हत्येच्या चौकशीसाठी पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पोलीस महानिरीक्षक सुरेश अरोरा यांना एसआयटीची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये या हत्येचा तीव्र निषेध करण्यात आला असून आरोपींना लवकरात लवकर पकडण्याची मागणी केली आहे.