वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आपल्या वाराणसी दौऱ्यातील शेवटच्या दिवशी शहंशाहपूर गावात स्वच्छ भारत अभियानानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी शौचालयासाठी खड्डा खोदून भूमिपूजन केलं. विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी काहीकाळ श्रमदानही केलं.


उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने आयोजित पशुधन आणि आरोग्य मेळाव्याचं उद्धाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी आज शहंशाहपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदन केलं.



तसेच स्वच्छ भारत अभियानानिमित्त आयोजित कार्यक्रमात एका शौचालयाचं भूमिपूजन करताना, स्वत: विटा रचून बांधकाम करत श्रमदानही केलं. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना, शौलयांना ‘लज्जा रक्षणाचं घरं’ असं नाव दिलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

ते म्हणाले की, “शौचालयामुळे घरातील माता आणि भगिनींचं रक्षण होतं. त्यामुळे आपण सर्वांनी प्रत्येक घरात लज्जा रक्षणाचं घर उभारणीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.”

दरम्यान, त्यांनी यावेळी बोलताना विरोधकांवरही जोरदार हल्लबोल केला. “आम्ही वोटबँकचं राजकारण करत नाही. आमची मतं मिळवण्याला प्राथमिकता नाही. काहीजण मतांसाठी काम करतात. पण आमच्या पक्षाला देश महत्त्वाचा आहे.”

पंतप्रधान पुढे म्हणाले की, “काळा पैसा, भ्रष्टाचाराविरोधातील लढाई सुरु झाली आहे. या लढ्यात सर्वसामान्य जनतेला थोडाफार त्रास सहन करावा लागत आहे. पण आता काळा पैसा दडवणाऱ्यांची काही खैर नाही. जनतेच्या प्रत्येक पैशाचा वापर, त्यांच्याच भल्यासाठीच होईल.”