नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचं अध्यक्षपद सध्या रिकामं आहे. काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष कोण होणार याबाबत अंदाज बांधले जात असताना आता अध्यक्षपदासाठी प्रियांका गांधी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसच्या काही मोठ्या नेत्यांनी प्रियांका यांच्या नावाला पसंती दिली आहे.


लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी जबाबदारी स्विकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर नवीन अध्यक्ष कोण होणार याची गेले कित्येक दिवस चर्चा सुरु आहे. मात्र आता या पदासाठी प्रियांका गांधी यांचं नाव चर्चेत आलं आहे. काँग्रेसचे नेते शशी थरुर, सी. वेणूगोपाल राव यांच्यानंतर आता पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही प्रियांका यांच्या नावाला पसंती दिली आहे. प्रियांका गांधी या काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी एक्सलंट चॉईस असतील आणि संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठिशी उभा असेल, असं ट्वीट कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केलं आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पुढचा अध्यक्ष कोण? यावरून गेले कित्येक दिवस खलबते रंगली आहेत. ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारून तरुण नेत्याला पक्षाचे नेतृत्व द्यावे अशी मागणी काँग्रेसच्या एका गटातून पुढे येऊ लागली आहे. अध्यक्षपदासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काही ज्येष्ठ नेत्यांची नावेही चर्चेत आहेत. मात्र शिंदे यांच्यासह मल्लिकार्जुन खरगे यांच्यासारख्या ज्येष्ठ चेहऱ्यांना काँग्रेसमधून विरोध होत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी युवा नेत्याला नवा अध्यक्ष बनवा, अशी मागणी केली होती. ज्येष्ठांनी युवा नेत्यांसाठी मार्ग खुला करावा असेही त्यांनी यापूर्वी म्हटले आहे. देशव्यापी ओळख आणि जमिनीशी नाळ जुळलेल्या युवा नेत्याला ही जबाबदारी द्यावी, असे सिंह यांनी म्हटले आहे.

सोनभद्रमध्ये पीडितांची भेट घेणाऱ्या प्रियांका गांधीची पोलिसांकडून अडवणूक