नवी दिल्ली :  आज लंडनमधील ओव्हल मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तानदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीतला अंतिम सामना होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघाची जोरदार तयारी सुरु आहे. पण मैदानाबाहेरही भारत-पाकिस्तानचे दोन माजी दिग्गज क्रिकेटपटूंमध्येही वाकयुद्ध रंगलं आहे. एबीपी न्यूजच्या विशेष कार्यक्रमात टीम इंडियाचा माजी तडाखेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरमध्ये हा सामना रंगला.

या चर्चेत शोएबच्या बाऊन्सरला वीराटने चोख प्रत्युत्तर दिलं. यावेळी वीरुनं विराट कोहलीला मैदानात डिवचण्याचा मुद्दा चर्चेत आला. त्यावर सेहवागने पाकिस्तानी संघाला धोक्याचा इशारा दिला. वीरु म्हणाला की, “पत्नीचा राग शांत करणं आणि मैदानात विराटला डिवचण्यात सर्वात मोठा धोका आहे.” वीरुच्या या वक्तव्यावर शोएबला काहीच बोलता आलं नाही. त्याने स्मित हास्य करुन, यावर उत्तर देणं टाळलं.

विशेष म्हणजे, यावेळी वीरुने शोएबला भारतीय संघाने आजपर्यंत कोणत्याही मोठ्या टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानकडून पराभवाला सामोरे जावं लागला नसल्याची आठवण करुन दिली. पण त्यावर पाकिस्तानचा बचावाचा तोकडा प्रयत्न करत शोएबने भारतीय संघापेक्षा पाकिस्तानने एकदिवसीय सामने जास्त जिंकले असल्याचं सांगितलं.

तसेच इतर सामन्याप्रमाणे या सामन्यात पाकिस्तानने भारताल हरवण्याचा विचार म्हणजे, जमीनीवर राहून आकाशातले तारे तोडण्यासारखं असल्याचं सांगितलं.

कर्णधार विराट कोहलीचीही वीरुने यावेळी मुक्तकंठाने स्तुती केली. वीरु म्हणाला की, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीत नेहमीच स्वत:चा दबदबा राखलाय. तसेच पाकिस्तानची कायमच वाट लावली आहे.

दरम्यान, गेल्याकाही दिवसांपासून सेहवाग आपल्या एका ट्वीटवरुनही चर्चेत आहे. वीरुनं हे ट्वीट भारतीय संघाने बांग्लादेशचा दारुण पराभव केल्यानंतर केलं होतं. या ट्वीटमध्ये सेहवाग म्हणतो, “नातवांनी, चांगला प्रयत्न केला. सेमीफायनलपर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रयत्न चांगला होता. घरातलीच गोष्ट आहे. ‘फादर्स डे’ला मुलासोबत फायनल मॅच आहे. हा विनोद आहे, सिरियस होऊ नका.”

विशेष म्हणजे, तब्बल दहा वर्षानंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आयसीसी टूर्नामेंटच्या फायनलमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानला आयसीसी टी-20 च्या अंतिम सामन्यात हारवलं होतं. त्यामुळे 2007 चीच पुनरावृत्ती करत भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करुन चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव करावे, अशी सर्व चाहत्यांची इच्छा आहे.

संपूर्ण कार्यक्रम पाहा