श्रीनगर : लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी जुनैद मट्टू याच्या अंत्ययात्रेत दहशतवाद्यांच्या टोळीनं बेछूट गोळीबार केल्याचं समोर आलं आहे. या गोळीबारामुळे परिसरात तणावाचं वातावरण होतं.

काश्मिरच्या अरवानी गावात शुक्रवारी सुरक्षा रक्षकांनी मट्टूसह तिघांचा खात्मा केला. त्यानंतर शनिवारी जुनैद मट्टूच्या अंत्ययात्रेसाठी अनेक गावांतून लोक आले होते. त्यात 4 ते 5 दहशतवादीही होते.

या दहशतवाद्यांनी हवेत बेच्छूट गोळीबार केल्याचं समोर येत असून, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतेय. विशेष म्हणजे, हे दहशतवादी गोळीबार करत असताना इतर लोक त्यांना प्रोत्साहन देताना दिसून येत आहे.

दरम्यान, शुक्रवारी जनैद मट्टूच्या खात्म्यानंतर घटनास्थळावरुन पोलिसांनी एके 47 सह सहा मॅगेझिन असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. यावेळी मट्टूसह अजून दोन दहशतवाद्यांनाही कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं होतं.

पण या कारवाईवेळी पुन्हा लष्करावर दगडफेकीची घटना घडली. यामुळे लष्काराच्या कारवाईत अडथळे येत होते.

कोण होता जुनैद मट्टू

जुनैद मट्टू हा लष्कर-ए-तोएबाचा दक्षिण काश्मीरमधील प्रमुख कुलगाममधील खुदवानी गावचा तो रहिवासी होता. तो ३ जून २०१५ मध्ये संघटनेत भरती झाला होता. जुनैद उच्च शिक्षित होता. गेल्यावर्षी दहशतवाद्यांच्या एका गटाने अनंतनाग पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. त्यावेळी जुनैद चर्चेत आला होता.

जुनैदने जून २०१६ मध्ये अनंतनागमधील एका वर्दळीच्या बस स्थानकावर दिवसाढवळ्या २ पोलिसांची हत्या केली होती.

त्यानंतर त्याच्यावर लाखो रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. अखेर आज त्याला कंठस्नान घालण्यात यश आलं.