बेळगाव: बेळगावात काळा दिनाच्या सायकल फेरीतील काही मराठी कार्यकर्त्यांवर थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
एक नोव्हेंबरला काळ्या दिनाच्या सायकल फेरीत काही तरुणा घोडा आणि खेळण्याची बंदूक घेऊन सहभागी झाले होते. त्या मराठी तरुणांवर आता राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मार्केट पोलिसांनी केलेल्या सुधारीत आरोपपत्रात 124 अ अंतर्गत दोन राज्यात तेढ निर्माण केल्याचा आरोप या तरुणांवर ठेवला आहे.
राजद्रोहाचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये रत्नप्रसाद पवार यांच्यासह अन्य पाच जणांचा समावेश आहे.
महापौर, उपमहापौरांना कारण दाखवा नोटीस
काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झाल्याबद्दल कर्नाटकच्या नगरविकास खात्याने बेळगावच्या महापौर आणि उप महापौरांना करणे दाखवा नोटीस बजावून महानगरपालिका बरखास्तीचा इशारा दिला आहे.
काळ्या दिनाच्या फेरीत महापौर सरिता पाटील आणि उप महापौर संजय शिंदे यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून सहभागी झाले होते . याविषयी कन्नड संघटना आणि कन्नड प्रसार माध्यमांनी महापौर ,उप महापौर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती . सरकारने काळ्या दिनाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्या कडून मागवला होता . जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल दिल्यावर नगरविकास खात्याने महापौर आणि उप महापौर याना करणे दाखवा नोटीस बजावली आहे . समर्पक उत्तर न दिल्यास कारवाई करण्याचा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे .
कर्नाटक राज्यत्सोव मराठी भाषिकांसाठी काळा दिवस
१ नोव्हेंबरला कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी मराठी भाषिकांनी काळा दिवस पाळला. आणि कन्नडीगांचा तिळपापड झाला. गेल्या ६० वर्षांपासून सीमाभागातील मराठी लोक काळा दिवस पाळतात. पण यावेळी कर्नाटक पोलिसांनी मराठी तरुणांचा घरामध्ये घुसून शोध घेतला. आणि तब्बल ४० तरुणांना अमानुषपणे बेदम मारहाण केली.
बेळगावमध्ये मराठी आणि कन्नडीगांचा वाद नवीन नाही. पण ज्या पद्धतीनं कर्नाटक सरकारनं पोलिसांना हाताशी धरुन मराठी तरुणांना मारहाण सुरु केलीय. हा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे आता तरी फडणवीस सरकारनं यात हस्तक्षेप करुन सीमा भागात मराठी लोकांवर होणारा अन्याय थांबवला पाहिजेत.