Secunderabad Fire : तेलंगणातील सिकंदराबादमध्ये (Secunderabad) सोमवारी रात्री (13 सप्टेंबर) भीषण अपघात झाला. इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोरुमला (E-Scooter Showroom) लागलेल्या भीषण आगीत आठ जणांचा होरपळून आणि गुदमरुन मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर भाजले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग झाल्याचं प्राथमिक कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान इलेक्ट्रिक स्कूटर शोरुमच्या इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे.


हैदराबादच्या उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त यांच्या माहितीनुसार, सिकंदराबादमधील पासपोर्ट कार्यालयाजवळ इलेक्ट्रिक स्कूटक शोरुम आहे. या शोरुममध्ये इलेक्ट्रिक बाईक चार्ज होत होती. यामुळे शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली. शोरुमच्या वर लॉज आहेत, ज्यामध्ये अनेक लोक अडकले होते. या घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य अजूनही सुरु आहे. 


इमारतीच्या मालकावर गुन्हा
"तळमजल्यावर इलेक्ट्रिक बाईक शोरुम आणि वर लॉज असलेले इमारतीचे मालक राजेंद्र सिंह बग्गा आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरु आहे. दुर्घटनेच्या वेळी लॉजच्या चार मजल्यांवर 25 ग्राहक होते आणि त्यांना बाहेर पडण्यासाठी फक्त एकच मार्ग होता. परिणामी तळमजल्यावरील शोरुममध्ये आग लागल्यानंतर हे ग्राहक वर अडकून पडले होते," अशी मार्केट पोलीस स्टेशनचे एसएचओ वाय नागेश्वर राव यांनी दिली.


मृतांमध्ये परराज्यातील नागरिकांचा समावेश
मृत हे परराज्यातील असल्याचं समजतं. चेन्नई, नवी दिल्ली, कोलकाता आणि विजयवाडामधील नागरिकांचा मृतांमध्ये समावेश आहे. इमारतीत अडकलेल्या 25 लोकांपैकी 15 जण सुखरुप बाहेर पडले. त्यापैकी दोघांनी खिडकीतून उडी मारली. अग्निशमन दलाने सहा जणांना पायऱ्यांवरुन वाचवले आणि गुदमरल्यामुळे बेशुद्ध पडलेल्या दोघांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


घटनेचा तपास सुरु : गृहमंत्री 
गृहमंत्री मोहम्मद महमूद अली यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी लॉजमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण धुरामुळे गुदमरुन काही जणांचा मृत्यू झाला. लॉजमधून काही जणांची सुटका करण्यात आली. ही घटना कशी घडली याचा आम्ही तपास करत आहोत."


पंतप्रधानांकडून दु:ख व्यक्त, नुकसानभरपाईची घोषणा
दरम्यान या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे की, "तेलंगणातील सिकंदराबाद इथे लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख झालं. मृतांच्या कुटुंबियांच्या प्रति माझ्या संवेदना. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून दोन लाख रुपये दिले जातील. तर जखमींना 50 हजार रुपये नुकसानभरपाई दिली जाईल.