वर्धा : बस, लोकल, रिक्षा इतकंच काय विमानातही गर्भवतीची प्रसुती झाल्याच्या घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. मात्र महिलेच्या प्रसुतीसाठी एक्स्प्रेस चक्क अर्धा तास थांबवल्याचा प्रकार पहिल्यांदाच समोर आला आहे.


प्रसुतीसाठी 26 वर्षांची मायादेवी श्यामसुंदर ही महिला गावी जात होती. त्यावेळी धावत्या ट्रेनमध्येच तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. वर्धा रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. त्यामुळे सिकंदराबाद-बिकानेर एक्स्प्रेस जवळपास अर्धा तास थांबवण्यात आली होती.

मायादेवी राजस्थानच्या पाल जिल्ह्यातील मोहराई या गावी एक्स्प्रेसने निघाली होती. आठवा महिना सुरु असतानाच म्हणजेच वेळेपूर्वी तिची प्रसुती झाली.

बाळाचं वजन एक किलो 870 ग्रॅम असल्याने त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. बाळासह त्याच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.