ज्ञानेश्वर मुळे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातल्या अब्दुललाट या गावचे. गेल्या काही दिवसांपासून पराराष्ट्र खात्यात 'पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया' म्हणून त्यांची ओळख झाली होती. कारण देशभरात असलेली 77 पासपोर्ट केंद्रांची संख्या त्यांच्या दोन वर्षाच्या सचिवपदाच्या कारकीर्दीत 319 वर पोहोचली.
'मी निवृत्त होतोय, असं मानत नाही, तर दुसऱ्या कामासाठी प्रवृत्त होतोय. 35 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत वेगवेगळ्या लोकांशी संपर्क आला. त्यातून वेगवेगळे अनुभव आले. हा सगळा अनुभवाचा साठा माझ्यापुरताच ठेवला, तर तो स्वार्थ ठरेल. त्याचा समाजाला फायदा व्हावा ही माझी इच्छा आहे.' असं मुळेंनी सांगितलं.
राजकारणात वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी यायला हवं. अभय बंग, सिंधुताई सपकाळ यासारख्या लोकांनी राजकारणात रस घ्यायला हवा, अशा भावनाही डॉ. मुळेंनी व्यक्त केल्या.
'माझे सर्वच पक्षातल्या लोकांशी चांगले संबंध आहेत. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत माझं बोलणं झालेलं आहे. पासपोर्ट कार्यालयाच्या निमित्ताने शरद पवार, अशोक चव्हाण, पृथ्वीराज यांच्याशीही बोलणं झालेलं आहे. ऐकावं जनाचं करावं मनाचं. मी जो विचार करेन तो जनहिताचा असेल' असं मुळेंनी सांगितलं.
'सक्रीय राजकारणात येण्याचा विचार माझ्या मनात नक्की आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या एखाद्या मतदारसंघातून लढायला आवडेल, पण अर्थात त्याबद्दल 31 तारखेनंतरच काही निश्चित सांगू शकेन.' असंही मुळेंनी स्पष्ट केलं.
'पक्ष हे काही साध्य नव्हे, साधन आहे. एका विशिष्ट पक्षातले सगळे लोक वाईट असतात, हा समज चुकीचा आहे. आपल्याला फार मार्ग उपलब्ध नाहीत. जे आहेत, त्यातूनच काहीतरी निवडावं लागतं. एखादी राजकीय संस्कृती खराब आहे म्हणून मी बदलण्याची शक्यता कमी आहे. कुठल्या पक्षाचा झेंडा हाती घेणार, हे लवकरच कळेल' असं सूचक वक्तव्य मुळेंनी केलं.