Amit Shah Gujarat Visit : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. त्यांच्या हस्त आज पंचामृत डेअरी गोध्रा येथील पीडीसी बँकेच्या मुख्यालयाच्या नवीन इमारत आणि मोबाईल एटीएम व्हॅनचे उद्घाटन होणार आहे. तसेच या कार्यक्रमानंतर अमित शाह यांच्या हस्ते ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटनही करणार आहेत. आपल्या भेटीदरम्यान अमित शाह विविध राज्यांतील पंचमहाल डेअरी प्लांटचे ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन करणार आहेत.



632 कोटी खर्चून उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलाची आज पायाभरणी


अमित शाह आज दुपारी 12 वाजता खेडा येथे गुजरात पोलिसांच्या निवासी आणि अनिवासी संकुलाचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता ते गांधीनगर याठिकाणी लोकसभेतील नारनपुरा येथे 632 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ऑलिम्पिक स्तरावरील क्रीडा संकुलाची पायाभरणी करणार आहेत. पंचामृत डेअरीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासोबतच अमित शाह पंचमहाल जिल्ह्यातील गोध्रा येथे एका सभेलाही संबोधित करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शाह नंतर खेडा जिल्ह्यातील नडियाद शहराला भेट देणार आहेत. तसेच गुजरात राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाने राज्यातील पोलीस विभागासाठी बांधलेल्या 57 निवासी आणि अनिवासी इमारतींचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. 



नरेंद्र मोदी स्टेडियमवर शाह आयपीएलचा अंतिम सामना पाहणार 


आज आयपीएल 2022 च्या हंगामातील अंतिम सामना होणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामना पाहण्यासाठी अमित शाह उपस्थित राहमार असल्याची माहिती गुजरात भाजपचे प्रवक्ते जितू वाघानी यांनी दिली आहे. गांधीनगर येथे 1 आणि 2 जून रोजी होणाऱ्या दोन दिवसीय राष्ट्रीय शालेय शिक्षण परिषदेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण मंत्री आणि शिक्षण सचिव सहभागी होणार असल्याची माहितीही वाघानी यांनी दिली आहे.